धक्कादायक ! पत्नीची हत्या करुन माजी पोलीस अधिकार्‍याची आत्महत्या

मदुराई : वृत्तसंस्था – लाच घेतल्याच्या प्रकरणात शिक्षा झालेल्या पोलीस अधिकार्‍याने पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मदुराईमध्ये घडली आहे. पेरुमल पंडियान असे या पोलीस अधिकार्‍याचे नाव आहे. पंडियान याला विशेष न्यायालयाने सोमवारीच लाच घेतल्याच्या प्रकरणात ३ वर्षाची शिक्षा ठोठावली होती.

पंडियान याने आपली पत्नी उमा हिच्या डोक्यात हातोडा मारुन तिची हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. सेलूर भागातील राहत्या घरी हा प्रकार घडला. पंडियान यांचा मुलगा सुंदर हा कॉप्युटर क्लासवरुन घरी परत आला. त्याने दार वाजविल्यावर घरातून कोणी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा सुंदरने शेजार्‍याच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. या घटनेची माहिती मिळताच सेलूर पोलीस घटनास्थळी पोहचले.

पंडियान यांच्या पत्नी उमा या महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांना दोन मुले आहेत. हा प्रकार होण्यापूर्वी दोघा पतीपत्नीत भांडणे झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

थेनी जिल्ह्यातील पांडियान हे मदुराईत स्थायिक झाले होते. डॉ. अशोककुमार यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा तपास करण्याची केस २०१० साली त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांनी १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितली होती. डॉ. कुमार यांनी केलेल्या तक्रारीनंतर पांडियान यांना सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले होते. या खटल्यात त्यांना ३ वर्षांची शिक्षा झाली होती.