महिलांनी कामावर साडी किंवा सलवार-कमीजच परिधान करावे ; ‘या’ राज्य सरकारचा नवा ‘फतवा’

चेन्नई : वृत्तसंस्था – तामिळनाडू सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेस कोड लागू केला आहे. तमिळनाडू सरकारनं महिलांनी साडी किंवा सलवार-कमीज किंवा चुडीदार व ओढणी परिधान करून कामावर यावं, असा आदेश काढला आहे.  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या या ड्रेस कोडची सर्वत्रच चर्चा आहे. त्यामुळे आता इतर कोणत्याही कपड्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर येता येणार नाही. भारतीय परंपरेची झलक सरकारी कार्यालयातही पहायला मिळावी, या उद्देशानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, तामिळनाडू सरकारनं एक आदेश जारी केला आहे. त्या आदेशात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड ठरवून देण्यात आला आहे. महिला कार्यालयात साडी, सलवार-कमीज आणि चुडीदार दुपट्टा परिधान करू शकतात. तर पुरुषांनी शर्ट-पँट किंवा पाश्चिमात्य कपडे परिधान करू शकतात. याशिवाय कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये इतर कोणत्याची प्रकारचे कपडे परिधान करण्यास अनुमती नाही. सरकारच्या या आदेशावर आता चहूबाजूंनी टीका केली जात आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांनीही या ड्रेस कोडवर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारचा हा निर्णय योग्य नसल्याचंही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. तर काही कर्मचाऱ्यांनी सरकारचं प्रतिनिधित्व करणारे आमदार विधानसभेत बसताना त्यांनाही ड्रेस कोड सक्ती करावी, सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.