सलाम ! पत्र पोहचवण्यासाठी रोज 15 किमी पायपीट करणारा पोस्टमन निवृत्त

चेन्नई : वृत्तसंस्था – पत्र पोहोचविण्यासाठी मागील 30 वर्षांपासून तामिळनाडूमधील डोंगराळ भागांमध्ये दररोज तब्बल 15 किमी पायी प्रवास करणारे पोस्टमन निवृत्त झाले आहेत. ज्या भागांमध्ये पत्र पोहचवण्याचे काम ते करायचे तेथील भौगोलिक परिस्थिती पाहिल्यास त्यांचे काम किती कष्टाचे होते याचा अंदाज येत आहे. हे पोस्टमन सध्या ट्विटवर चर्चेचा विषय ठरत आहे. डी. सिवन असे त्यांचे नाव असून पोस्टात 30 वर्ष सेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले आहेत.

मुळात डिजीटल जमान्यामध्ये पोस्टमन हा चर्चेचा विषय ठरु शकतो याबद्दलच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र सध्या ट्विवटर या पोस्टमनला योग्य तो सन्मान दिला गेला पाहिजे असे मत अनेकजण ट्विटवर व्यक्त करत आहेत. सिवन पत्र पोहचवण्यासाठी ज्या भागामधून चालत जायचे तो जंगली प्रदेश आहे. अनेकदा या रस्त्यांवर दूर दूरपर्यंत कोणी दिसत नाही. इतक्या प्रदीर्घ सेवेच्या कालावधीमध्ये अनेकदा त्यांचा सामना जंगली प्राण्यांशी झाला आहे. यामध्ये अगदी सापांपासून जंगली अस्वलांपर्यंत अनेक प्राण्यांचा समावेश आहे. एकदा तर चक्क हत्तीच्या एका टोळीने सिवन यांचा रस्ता अडवला होता.

आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटवरुन सिवन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मागील 30 वर्षांमध्ये मन लावून काम करणार्‍या सिवन यांची साहू यांनी स्तृती केली आहे. पोस्टमन डी. सिवन रोज घनदाट जंगलामधून 15 किमी चालत जायचे. कुन्नूरमधील दूर्गम भागांमधील पत्र पोहचवण्याचे काम ते करायचे. अनेकदा जंगली हत्ती, अस्वलांनी त्यांचा पाठलाग केला आहे. निसटणार्‍या पायवाटा, धबधबे यांच्यामधून वाट काढून ते आपले काम करायचे. मागील 30 वर्षांपासून सेवा देणारे सिवन मागील आठवड्यात निवृत्त झाले, अशी कॅप्शन साहू यांनी सिवन यांचा पुलावरुन चालताना फोटोला दिली आहे.