…म्हणून तर भाजप 24 तास माझ्यावर हल्ला चढवतंय – राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर तमिळनाडूमध्ये प्रचारासाठी आलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी भारताच्या हितांसाठी तडजोड करतील, हे चीनला माहिती होते. तसेच मी भ्रष्ट नाही म्हणून भाजप 24 तास माझ्यावर हल्ला चढवत आहे.

थुथुकुडी येथे आयोजित एका सभेत राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, ‘लोकशाही एका झटक्यात नष्ट होत नाही तर ती हळूहळू नष्ट होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) संस्थांचे संतुलन बिघडवले आहे. महिला आरक्षणावर बोलताना ते म्हणाले, मी न्यायपालिका आणि संसद या दोन्ही ठिकाणी महिलांना आरक्षण मिळावे, या विचाराचा आहे. प्रत्येक ठिकाणी भारतीय पुरुष स्वत:ला जसे पाहतात तसेच त्यांनी महिलांकडे पाहिला हवे.

रिलायन्स आणि अदानी यांना फायदा मिळण्याच्या आरोपावर राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी उपयोगी आहेत की व्यर्थ हा प्रश्न नाही. पण प्रश्न हा आहे, की ते कोणासाठी उपयोगी आहेत. पंतप्रधान मोदी दोन लोकांसाठी जास्त उपयोगी आहेत. ‘हम दो, हमारे दो’ हे लोक पंतप्रधानांचा वापर करून संपत्ती वाढवण्यासाठी करत आहेत. त्यांच्यासाठी पंतप्रधान मोदी उपयोगी आहेत तर गरीबांसाठी ते व्यर्थ आहेत.

‘एक देश, एक भाषा’वर राहुल गांधी म्हणाले…
‘एक देश, एक भाषा’च्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, तमिळनाडूच्या लोकांसाठी तमिळ महत्वपूर्ण भाषा आहे. अशाचप्रकारे विविध राज्यांतील लोकांसाठी वेगवेगळ्या भाषा आहेत. ‘एक देश, एक भाषा’च्या नावावर ते राज्यांत हिंदी थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘आम्ही रिमोट कंट्रोलची बॅटरीच काढू’
पंतप्रधान मोदींना वाटते, की ते तमिळनाडूला रिमोट कंट्रोलने कंट्रोल करतील. पण आम्ही असे होऊ देणार नाही. आम्ही रिमोटमधून बॅटरीच काढू आणि त्यांच्या हातून कंट्रोलच काढून घेऊ.