आमदाराच्या ड्रायव्हरच्या घरी सापडली तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड

चेन्नई : आयकर विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये एका आमदाराच्या ड्रायव्हरच्या घरीतून १ कोटी रुपये जप्त करण्यात आले. अण्णा द्रमुकचे आमदार के. चंद्रशेखर या आमदाराच्या ड्रायव्हरकडे ही रक्कम सापडली आहे. अलगरासामी (वय ३८) असे या ड्रायव्हरचे नाव आहे. त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तामिळनाडुच्या त्रिची जिल्ह्यातील मनाप्पराई मतदारसंघाचे चंद्रशेखर हे आमदार आहेत. गेली १० वर्षे अलगरासामी हे चंद्रशेखर यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत. आता ते तिसर्‍यांदा निवडणुक लढवत आहेत. चंद्रशेखर यांचे दोन साथीदार थंगपंडी आणि कोट्टाइपट्टीमधील आनंद यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत.

मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याची माहिती आयकर विभागाकडे आल्यानंतर त्रिची आयकर विभागाचे उपसंचालक मदन कुमार यांच्या नेतृत्वाखाली ३ पथकांनी एकाच वेळी तीन ठिकाणी छापे घातले. चंद्रशेखर यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. त्यात कोणतेही कागदपत्रे अथवा आवश्यक माहितीशिवाय ठेवलेले १ कोटी रुपये यावेळी जप्त करण्यात आले. अलगरासामी यांच्याकडे ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात ही रक्कम होती.