तामिळनाडूत हिंदी भाषेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर ; कमल हसन, डीएमकेकडून विरोध

चेन्नई : वृत्तसंस्था – दक्षिणेतील राज्यांनी नेहमीच हिंदी भाषेला विरोध दर्शवला आहे. यामुळे अनेकदा वादही झाले आहेत. तामिळनाडूत हिंदी भाषेवरुन पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. केंद्र सरकारने तामिळनाडूतील शाळांमध्ये तीन भाषा प्रणालीचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाला डीएमके आणि मक्कल नीधिमय्यम पक्षांनी विरोध दर्शवला आहे. तसेच तामिळनाडूतील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य केल्यास केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे हिंदी भाषेवरून तामिळनाडूत पुन्हा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हिंदी जरी देशाची राष्ट्रभाषा असली तरी दक्षिणेतील राज्ये हिंदीला स्वीकारण्यास तयार नाहीत. देशात तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची नाही. मात्र केंद्र सरकार तामिळनाडूमध्ये ‘तीन भाषा प्रणाली’ लागू करण्याचा विचार करत आहे. याला डीएमकेचे राज्यसभा खासदार तुरुचि सिवा आणि मक्कल नीधि मय्यम पार्टीचे प्रमुख कमल हसन यांनी विरोध केला आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना कमल हसन म्हणाले की, ‘मी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तरीही मला असे वाटते की हिंदी भाषा कोणावरही लादली जाऊ नये. तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला, तर येथील जनता हे सहन करणार नाही.’