पक्षी अन् त्याच्या पिल्लांसाठी तब्बल 35 दिवसांपर्यंत अंधरात राहिले ‘हे’ गाव, जाणून घ्या प्रकरण

मदुराई : पोलीसनामा ऑनलाइन –  असे म्हटले जाते की, जर माणसाची इच्छा असेल तर तो मानवतेद्वारे जग आणखी सुंदर बनवू शकतो. होय, याचे खुप उत्तम उदारहण तमिळनाडुतून समोर आले आहे. येथे एक पक्षी आणि त्याच्या पिलांसाठी संपूर्ण गाव 35 दिवसांसाठी अंधारात जीवन जगत होते.

शिवगंगा जिल्ह्याची स्ट्रीट लाइट ज्या स्विचबोर्डमधून सुरू होते, त्या ठिकाणी लॉकडाऊनच्या सुरूवातीला एका पक्षाने घरटे तयार करून त्यामध्ये तीन अंडी घातली होती. लोकांनी घरट्यात वाकून पाहिले असता आतमध्ये तीन निळी आणि हिरव्या रंगाची अंडी होती.

लोकांना भिती होती की, जर स्विचबोर्डचा वापर केला तर पक्षाची अंडी फुटतील. हा विचार करता संपूर्ण गावाने निर्णय घेतला की, जोपर्यंत अंड्यातून पिले बाहेर येत नाहीत तोपर्यंत स्विचबोर्डचा वापर करायचा नाही.

टाइम्स नाऊने यासंबंधीचे वृत्त दिले होते. या वृत्तानुसार, एका व्यक्तीने पक्षाच्या घरट्याचे फोटो गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले. यानंतर व्हॉट्सअपमध्येच लोकांनी निर्णय घेतला की, जोपर्यंत अंड्यातून पिले बाहेर येत नाहीत, तोपर्यंत आणि ती मोठी होत नाहीत तोपर्यंत कुणीही स्विचबोर्डचा वापर करून लाईट लावणार नाहीत.

ग्राम पंचायतच्या अध्यक्ष एच कालीश्वरी सुद्धा या मोहिमेत सहभागी झाल्या. परंतु, गावातील काही लोकांनी या निर्णयाला विरोधसुद्धा केला. त्यांनी पक्षी आणि अंड्यासाठी गाव काळोखात ठेवणे हा मुर्खपणा असल्याचे म्हटले. नंतर ग्रामस्थांनी यावरून बैठक घेतली आणि लाईट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यावर सहमती झाली.