काय सांगता ! होय, DMK च्या विजयानंतर महिलेने फेडला नवस; सकाळी-सकाळी मंदिराबाहेर कापली स्वतःची जीभ, जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन – तामिळनाडूत विजयानंतर समर्थक मुंडन करणे ही तर सामान्य गोष्ट आहे. मात्र येथे द्रविड मुन्नेत्र कडगमच्या (डीएमकेच्या) मोठ्या विजयानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. डीएमके समर्थक असलेल्या रामानाथापूरम जिल्ह्यातील एका महिलेने सोमवारी (दि. 3) सकाळी एका मंदिराबाहेर आपली जीभ कापली. या महिलेने एका मंदिरात तामिळनाडूमध्ये 2021मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेचे सरकार आल्यास आपण आपल्या जिभेचा बळी देऊ, असा नवस केला होता. तो फेडण्यासाठी तिने हे अघोरी कृत्य केल्याचे समोर आले आहे.

वनिथा (वय 32 रा. परमाकुडी) असे या महिलेचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डीएमकेला राज्यात बहुमत मिळाल्यानंतर वनिथा या मुथाल्लन मंदिरात पोहोचल्या. तेथिल मूर्तीसमोर जीभ कापून नवस पूर्ण करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, कोरोनामुळे तामिळनाडूतही धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेरच आपली जीभ कापली.

मंदिराच्या गेटवरच जीभ ठेवल्यानंतर वनिथा यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाल्याने त्या बेशुध्दावस्थेत पडल्या. त्यानंतर काही लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान तामिळनाडूत डीएमके आणि एआयडीएमके या दोन्ही राजकीय पक्षात मुख्य नेत्यांवर समर्थक प्रमाणाबाहेर प्रेम करतात. 2016 मध्ये एआयडीएमकेच्या प्रमुख जयललिता यांचे निधन झाले होते. यावेळी, जवळपास 30 जणांचा जयललिता यांच्या निधनाचे वृत्त समजताच मृत्यू झाल्याचे समोर आले होते.