जळता टायर कानात अडकल्याने वेदनेने पळू लागला हत्ती, उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   तामिळनाडूतील नीलगिरी येथे हत्तीच्या मृत्यूने सर्वांना हादरवून सोडले आहे. माहितीनुसार, एका व्यक्तीने जळते टायर हत्तीवर फेकले, जे त्याच्या कानात अडकले. या जळत्या टायरमुळे हत्ती गंभीर जखमी झाला आणि काही दिवसांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे संपूर्ण प्रकरण नीलगिरीच्या मसिनागुड़ी भागातील आहे. येथे एका व्यक्तीने टायर पेटवून 40 वर्षांच्या हत्तीवर फेकले. हा जळणारा टायर हत्तीच्या कानात अडकला. ज्यामुळे हत्ती वेदनेने पळायला लागला. यावेळी, त्याच्या कानाच्या आसपासचा परिसर गंभीररीत्या जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा हत्ती जखमी अवस्थेत पाहून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारांसाठी मुदुमालाई व्याघ्र प्रकल्पात नेले. मात्र, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्व प्रयत्न करूनही हत्तीला वाचवता आले नाही. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर हत्तीला क्रेनद्वारे ट्रक मध्ये नेऊन अंतिम संस्कार करण्यात आले.

हत्तीच्या अंतिम यात्रेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यात वनविभागाचे अधिकारी ट्रकमध्ये हत्तीची सोंड पकडून रडताना दिसत आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या या भावनिक व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांना भावूक केले आहे. हा व्हिडिओ मायक्रोब्लॉगिंग साइटवर हजारो लोकांनी पाहिला आहे.