योगींच्या राज्यात तानाजी ‘टॅक्स फ्री’, छत्रपतींच्या महाराष्ट्रात कधी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ओम राऊत दिग्दर्शित ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळत आहे. अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल यांच्या दमदार अभिनयाला चाहत्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तानाजी चित्रपटांबरोबरच दीपिका पादुकोण स्‍टारर ‘छपाक’ देखील एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंत चांगली कमाई केली असली तर तानाजीने छपाकला मागे टाकत बाजी मारली आहे. तानाजी चित्रपटाने तीन दिवसात 61.75 कोटी तर, छपाकने केवळ 19.02 कोटींची कमाई केली आहे. त्यात आता योगी सरकारने उत्तर प्रदेशात तानाजी चित्रपट करमुक्त केला आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीर मावळ्यांतील तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा दर्शविण्यात आली आहे. कोंढाणा, सध्याचा सिंहगड किल्ला घेताना धारातीर्थी पडलेल्या तानाजी मालुसरेंबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे म्हटले होते. तानाजी मालुसरेंनी महाराष्ट्राच्या मातीत पराक्रम गाजवला. त्यामुळे, उत्तर प्रदेशातील योगी सरकारने उत्तर प्रदेशमध्ये तानाजी चित्रपट करमुक्त केला आहे. राज्य सरकारच्या आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा चित्रपट करमुक्त करण्यात आला.

दरम्यान, तानाजी चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी होत आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तानाजी चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे. सध्या, तानाजी अन् छपाक चित्रपटावरुन देशात राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह डाव्या पक्षांकडून छपाकला समर्थन देण्यात येत आहे, तर भाजपाकडून तानाजी चित्रपटाला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे, छत्रपतींच्या महाराष्ट्रात हा चित्रपट कधी करमुक्त होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/