पुण्यात पेट्रोल घेऊन जाणारा टॅंकर उलटला ; अग्निशमनच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वारजे माळवाडी येथे चांदणी चौकाकडून कात्रजकडे जाणारा पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टॅंकर पलटी झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. टॅंकर पलटल्याने हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेल सांडले असून खबरदारीचा उपाय म्हणून रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या चार फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर उलटलेला ट्रक क्रेनच्या साह्याने सरळ करण्यात आला आहे.

अग्निशमन दलाचे अधिकारी पात्रुडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथे मुंबई बंगळूरू महामार्गानजीक असलेल्या माई मंगेशकर रुग्णालयाच्या समोर असलेल्या हुंदाई शोरुमसमोर हा टॅंकर उलटला आहे. सकाळी दहाच्या सुमारास टॅंकर उलटला. या टॅंकरमध्ये हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेल आहे. तो पुर्णपणे भरलेला असल्याने त्यातून पटली झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल वाहात होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून य़ा टॅंकरमधील पेट्रोल आणि डिझेलची गळती रोकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले. तसेच खासगी क्रेनच्या साह्याने हा टॅंकर सरळ करण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर तो सरळ करण्यात यश आले. त्यामुळे त्यातील पेट्रोल आणि डिझेलची गळती थांबिण्यात यश आले आहे.

मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात त्यातील द्रव सांडल्याने रस्ता निसरडा झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तो रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी माती टाकून तो ज्वलनशील द्रव सध्या तरी वाहण्यापासून रोकण्यात आला आहे.