मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडमध्ये मीटू मोहीम सुरु करून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता लवकरच एका लघुपटाची निर्मिती करणार आहे. काही महिन्यापूर्वी तनुश्रीने लैंगिक अत्याचारवर आवाज उठवून बॉलिवूडमध्ये मीटू मोहीम सुरु केली होती. यानंतर अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या अत्याचारा विरोधात आवाज उठवला होता. या मोहिमेत अनेक दिग्गज कलाकारांवर आरोप झाले होते. याच बॉलिवूडमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर तनुश्री लघुपटाची निर्मिती करणार आहे.
बॉलिवूड मधल्या लैंगिक शोषणाचं विदारक वास्तव तनुश्री या लघुपटातून मांडणार आहे. बॉलिवूडमध्ये ज्यांचा कोणीही वाली नसतो. अशा होतकरू नवीन अभिनेत्रींना या ग्लॅमरस दुनियेत अनेक संकटाना तोंड द्यावं लागत. त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं म्हणूनच या दुनियेचं भीषण वास्तव मी या लघुपटात मांडणार आहे असं तनुश्री म्हणाली.
तसेच ‘या लघुपटातून आपण अशा अनेक मुलींना मार्गदर्शन करणार आहोत. योग्य निर्णय कसा घ्यावा याविषयी मी त्यांना अनेक गोष्टी सांगणार आहे. तब्बल ९ वर्षांनी मी कॅमेराला सामोरी जात आहे त्यामुळे दडपण आहे पण हा लघुपट अनेकींना मार्गदर्शक ठरणार आहे’,असंही तनुश्री म्हणाली.हा लघुपट ८ मार्च म्हणजेच महिला दिनी ऑनलाईन प्रदर्शित होणार आहे. या लघुपटाचे नाव ‘गार्डीयन एंजल’ असल्याची चर्चा आहे.