#MeToo मला या चळवळीच श्रेय नको ! – तनुश्री दत्ता

मुंबई : वृत्तसंस्था – दोन महिन्यांपूर्वी तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo नामक चळवळच सुरू झाली होती. त्यानंतर अनेक महिलांनी आपल्यावरील अत्याचार मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणले ही लाट केवळ बॉलिवूडपुरतीच मर्यादित राहिली नाही. तर क्रीडा व शिक्षण क्षेत्रातल्या महिलांनीही आपल्यावरील अत्याचाराविरोधात वाचा फोडली. या चळवळीचं श्रेय आता तनुश्रीला दिलं जाऊ लागलं आहे. तनुश्रीनं मात्र हे श्रेय नाकारलं आहे.

‘मीटू चळवळीचं श्रेय मला नको. मी एक सामान्य महिला आहे. मी केवळ माझा अनुभव सांगितला. त्यातून समाजात जागरूकता आली. त्यापेक्षा जास्त मी काहीच केलं नाही. मीडिया उगाचच मला हिरोइन बनवते आहे,’ अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांच्या लैंगिक शोषणाचे आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं व्यक्त केली आहे.

‘ज्या एका गोष्टीमुळं मी माझ्या व्यावसायिक आयुष्यात मागे पडले होते, त्याचा मला बदला घ्यायचा होता. आता मात्र मी माझं आयुष्य सर्वसामान्यांसारखं जगणार आहे,’ असं तनुश्रीनं म्हटलं आहे. ‘मी सध्या अमेरिकेत राहते. खरंतर मी अमेरिकेला परत जाणारच होते. पण योगायोगानं ही सुट्टी बरीच लांबली. अर्थात, मी परत येईन. मला माझ्या कुटुंबाची व मित्र-मैत्रिणींची आठवण येत राहील. मी इथं नसले तरी #MeeToo चळवळ सुरूच राहील, अशी आशाही तिनं व्यक्त केली.