टांझानिया : चर्चमधील कार्यक्रमादरम्यान गोंधळ, चेंगराचेंगरीत 20 जणांचा मृत्यू

टांझानिया/किलिमंजारो : वृत्तसंस्था – टांझानियाच्या एका चर्चच्या बाहेरील मैदानात आयोजित केलेल्या प्रार्थनेच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोळा जण जखमी झाले आहेत. टांझानियातील मोशी शहरात ही दुर्घटना घडली असून मृतांमध्ये पाच बालकांचा समावेश आहे. टांझानियाच्या माऊंट किलीमांजारो शिखराच्या पायथ्याशी असलेल्या मोशी शहरातील चर्चच्या बाहेर प्रर्थनेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चर्चकडून भाविकांना पवित्र तेलाचे वाटप करण्यात येणार होते.

पवित्र तेल मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 20 जणांचा मृत्यू झाला तर 16 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 लहान बालकांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी किप्पी वारिओबा यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, पवित्र तेल मिळवण्यासाठी लोक एकाचवेळी पळाले. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वारिओबा यांनी सांगितले की, शनिवारी उशीरा रात्री ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही लोकांचा जागीच मृत्यू झाला तर काहींना रुग्णालायात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.

चर्चकडून देण्यात येणाऱ्या तेलामुळे घरात समृद्धी येईल तसेच अनेक दुर्धर आजारांवर हे रामबाण असते असे भाविकांचे म्हणने आहे. त्यामुळे ते तेल घेण्यासाठी वेगवेगळ्या शहरातून हजारो भाविक या ठिकाणी आले होते. त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली. टांझानियात गेल्या काही वर्षापासून अशा प्रकारच्या अधश्रद्धांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.