Coronavirus : ‘कोरोना’वर भाजप नेत्याने सुचवलं ‘हे’ जालीम औषध

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूची लागण झालेले सात रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यामध्ये या विषाणूची लागण झालेले पाच रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून वेगवेगळे उपाय राबवले जात असतानाच एका भाजप नेत्याने चक्क तपकिर ओढल्याने कोरोना विषाणूपासून बचाव होऊ शकतो असा अजब दावा केला आहे.

जुन्या काळात ग्रामीण भागातील महिला व पुरुष तपकीर ओढत. तपकिरीला उग्र वास असतो. त्यामुळे कोरोनासारखा व्हायरसही तेथे राहू शकत नाहीत. कोरोनाच्या लागण झालेल्या रुग्णांना या तपकीरीचा औषध म्हणून उपयोग होऊ शकतो का याचा अभ्यास करावा असे आवाहन श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजेंद्र नागवडे यांनी केले आहे. नागवडे यांनी स्वत: आपला एक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राजेंद्र नागवडे म्हणतात, जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर या सर्वांना नम्र विनंती करून आवाहन करत आहे. पूर्वीच्या काळामध्ये पुरुष आणि स्त्रिया तपकीर ओढायचे. तपकीरीमध्ये विशिष्ट प्रकारचा उग्र वास असतो. त्या वासामुळे कुठल्याही प्रकारचा जिवाणू किंवा विषाणू आपल्याला धोकादायक ठरत नाही. त्यामुळे आपण सर्वांना यावर निश्चित विचार केला पाहिजे. ज्याला कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे त्या सर्वांना तपकिरीचा काही उपयोग होऊ शकतो का याचा विचार करायला हवा. ज्यांना हा रोग होतोय त्यांना तपकिर दिल्यास त्यापासून त्यांचा बचाव होऊ शकतो का हे आपण सर्वांना तपासलं पाहिजे. यावर सर्व तज्ज्ञांनी आणि डॉक्टरांनी आपले मनोगत नोंदवून यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतल्यास फायद्याचं ठरेल, असे म्हणत नागवडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.