भारताने सर्वात आधी ‘कोरोना’वर लस शोधावी, ‘या’ विदेशी लेखिकेने व्यक्त केली इच्छा

पोलिसनामा ऑलनाईन – कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच रुग्णांना बरे करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत असून, डॉक्टरांचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर वैज्ञानिकही कोरोनावर लस शोधण्याचे काम करत आहे. या दोन्ही आघाड्यांवर काम करणार्‍या डॉक्टर आणि संशोधकांचं बांगलादेशी लेखिका तसलिमा नसरीन यांनी भारतातील डॉक्टर आणि वैज्ञानिकांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

कोरोनाविरोधातील लढ्यात डॉक्टरांसह आरोग्य सेवेतील कर्मचारी जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. अनेक संस्थामधील संशोधक हे काम करत आहेत. या डॉक्टरांचे बळ वाढवण्याचा प्रयत्न सगळीकडूनच होत असून, बांगलादेशी लेखिका तसलिमा नसरीन यांनीही भारतातील डॉक्टरांचे कौतुक केले आहे. नसरीन यांनी एक ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत. भारतातील डॉक्टर आणि वैज्ञानिक खूप चांगले आहेत. माझी मनापासून अशी इच्छा आहे की, सर्वात आधी भारताने कोरोनावर लस शोधावी. जगातील 7.8 बिलियन लोकांना ही लस मदत करेल, अशा आशावादी भावना नसरीन यांनी भारताविषयी आणि भारतातील डॉक्टरांविषयी व्यक्त केल्या आहेत.

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायल या देशांप्रमाणे भारतातही कोरोना व्हायरसला रोखणारे प्रभावी औषध शोधून काढण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. भारतात एकूण 30 समूह कोरोनाचा फैलाव रोखणारी लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात सहा लस प्रकल्पांवर विशेष लक्ष असून त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्याशिवाय आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या 10 वेगवेगळया औषधांचा कोरोनावरील उपचारांमध्ये वापर सुरु आहे. सध्या ही औषधे चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत.