माजी कर्मचाऱ्याचे नाव ‘कार’ला देऊन केला सन्मान, टाटा मोटर्सच्या ‘या’ कारची विक्रमी विक्री

पोलीसनामा ऑनलाइन – टाटा मोटर्सची अतिशय लोकप्रिय कार ‘टाटा सुमो’ हे नाव कदाचित तिच्या आकारामुळे ठेवण्यात आले आहे असे लोक नेहमी विचार करतात. पण हे सत्य नाही. या कारला नाव देण्यामागे एक वेगळी कथा आहे. त्याबाबत आज जाणून घेऊया.

जगातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक म्हणजे टाटा मोटर्स होय. भारत आणि जगभरात मोठ्या संख्येने टाटा मोटर्सची वाहने लोक खरेदी करत असतात. अशीच एक म्हणजे एसयूव्ही टाटा सुमो होय. टाटा समूहाने या कारचे नाव टाटा मोटर्सचे माजी एमडी सुमंत मुळगावकर यांच्या नावावर ठेवले आहे. सुमोचे नाव त्यांच्या नावाच्या पहिल्या आणि दुसर्‍या अक्षराच्या सुरुवातीच्या शब्दांना घेऊन ठेवले गेले आहे. टाटा मोटर्ससाठी हे नाव खूप लकी असल्याचे म्हटले जाते. लॉन्च झाल्यापासूनच या कारची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. ज्यांना प्रवास करायला आणि मोठ्या कार आवडतात त्यांनी या कारला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा आपल्या कर्मचार्‍यांच्या भल्यासाठी कसे कार्य करतात याचा हा एक दाखलाच आहे.

1994 मध्ये टाटा मोटर्सने रिअर व्हील ड्राइव एसयूव्ही ‘टाटा सुमो’ ला 10 सीटर कार म्हणून लॉन्च केले होते. तसेच ही कार लॉन्च करण्यामागील उद्देश म्हणजे सैनिकी वापर आणि ऑफ रोड ट्रान्सपोर्ट वाहतुक हा होता. या कारच्या लॉन्चिंगनंतर मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. 1997 पासून सुमारे एक लाखांहून अधिक सुमोची विक्री झाल्याचे दिसून येते.

अशा प्रकारे झाली ‘टाटा मोटर्स’ची सुरुवात
1945 मध्ये जेआरडी टाटा यांनी टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी (टेल्को) ची स्थापना केली. आज आपण या कंपनीला ‘टाटा मोटर्स’ म्हणून ओळखतो. 1954 मध्ये टाटा मोटर्सने जर्मन कार निर्माता ‘डेमलर बेंझ एजी’सह वाहन निर्माण क्षेत्रात प्रवेश केला. 1998 मध्ये कंपनीने ‘टाटा इंडिका’ ही पहिली स्वदेशी कार बाजारात आणली. 1998 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये कंपनीने ‘टाटा इंडिका’ लॉन्च केली होती.