टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या कर्करोग मार्गदर्शन शिबिरामुळे आरोग्य यंत्रणेला गती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्करोग प्रतिबंधात्मक विभाग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांच्यातर्फे आयोजित कर्करोग निदान व उपचार शिबिर राबविण्यात आले होते. या ५ दिवसांच्या शिबिरामुळे कर्करोग, उपचार याबाबत नवा दृष्टिकोन प्राप्त झाल्याचा सूर आरोग्य यंत्रणेतील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील डॉक्टरांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉ. शर्मिला पिंपळे, डॉ. गौरवी मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे कर्करोग प्रतिबंधात्मक विभाग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईचे तज्ज्ञ डॉक्टर, दत्ता मेघे हॉस्पिटल वर्धा व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. सदर शिबिरात हजारावर रुग्णांनी तपासणी केली. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आढळलेल्या रुग्णांची पुढील तपासणी व उपचार दत्ता मेघे हॉस्पिटल वर्धा व टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे करण्यात येतील.
आशा स्वयंसेविकांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरामध्ये जिल्हाभरातील ३४८ आशा स्वयंसेविकांना मार्गदर्शन करण्यात आले. ११० परिचारिका व अधिपरिचारिका यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. जिल्हाभरातील २३८ अंगणवाडी सेविकांना कर्करोगाची लक्षणे व प्रतिबंध याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणानंतर शिबिराची सांगता करण्यात आली. यावेळी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे उपस्थित होते. त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स व टीमचे आभार मानले. सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थींना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या पाच दिवसांच्या कर्करोग मार्गदर्शन, निदान व उपचार शिबिराच्या यशस्वीतेसाठी कन्यका माता सेवा ट्रस्ट, वन विकास महामंडळ, टाटा ट्रस्ट, चंद्रपूर कॅन्सर केयर फाउंडेशन, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, दत्ता मेघे हॉस्पिटल वर्धा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, पालकमंत्री इंटर्न्स, जनसेवा फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.
——————————————-