जानेवारीपर्यंतच ‘टाटा’च्या गाड्या खरेदी करा, कारण….

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वाहन उत्पादन  क्षेत्रामध्ये आघाडीवर असणाऱ्या टाटा मोटर्सने ग्राहकांना धक्का देण्याचे ठरवले आहे.  टाटा मोटर्सने आपल्या गाड्यांच्या किमती १ जानेवारीपासून ४० हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा बरोबरच फाेर्ड इंडियानेही अापल्या गाड्यांच्या किंमती २.५ टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. बाजारपेठेतील बदलती समीकरणे आणि वाढता खर्च, याशिवाय इतर आर्थिक कारणांमुळे ही वाढ केली जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीचे नुकसान टाळण्यासाठी किंमत वाढ –
टाटा मोटर्सच्या नोव्हेंबर महिन्यातील गाड्यांच्या विक्रीत अपेक्षेपेक्षा फार कमी वाढ झाली. हीच स्थिती आॅक्टोबरमध्येही होती. प्रामुख्याने घरगुती प्रवासी वाहनांची विक्री कमी झाली आहे. देशाची आर्थिक स्थिती पाहता त्यात फार वाढ होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळेच अधिक नुकसान होण्याऐवजी कंपनीने १ जानेवारी २०१९ पासून किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहन क्षेत्रात मंदीसदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. उत्पादनाच्या तुलनेत वाहनांची विक्री नाही. त्याचा आॅटोमोबाइल कंपन्यांना फटका बसत आहे. खर्च भरुन काढण्यासाठी कंपन्यांसमोर आता वाहने महाग करण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. यामध्ये टाटा मोटर्सने आघाडी घेतली आहे. नववर्षात गाड्यांची किंमत वाढविण्याची घोषणा कंपनीने केली आहे.
या कार होणार महाग –
टाटाच्या नॅनोपासून हेक्झा या मॉडेलच्या किमती सध्या २.३६ लाखांपासून १७.९७ लाख रुपयांपर्यंत आहेत. दरम्यान, फाेर्ड इंडियानेही अापल्या गाड्यांच्या किंमती २.५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घाेषणा केली अाहे.प्रवासी श्रेणीतील सर्व वाहनांच्या किमती ४० हजार रुपयांपर्यंत वाढणार आहेत. त्यामध्ये टीअ‍ॅगो, हेक्सा, टीगोर, नेक्सॉन व एसयूव्ही श्रेणीतील हॅरिअर यांचा समावेश आहे. बाजारातील बदलत्या स्थितीनुसार किंमत वाढीचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
करप्रणालीचा परिणाम-
दरम्यान या पूर्वी २०१६ मध्ये टाटा मोटर्सने  ‘नॅनो’, नवीन लॉन्च झालेली ‘टियागो’ आणि ‘आरिया’ या तीन गाड्यांच्या किंमतीत ५ हजारांपासून ते १२ हजारांपर्यंत वाढ केली होती. त्यानंतर १ जुलैपासून देशात जीएसटी ही नवी करप्रणाली लागू झाली. त्यानंतर सर्वच क्षेत्रावर या करप्रणालीचा परिणाम पाहायला मिळाला. नव्या करांमुळे अनेक कंपन्यांनी आपापल्या वस्तूंचे दर कमी-जास्त केले. टाटा मोटर्सने आपल्या गाड्यांच्या किंमती तब्बल १२ टक्‍क्‍यांपर्यंत घटवल्या आहेत.
२०१८ मध्ये टाटाच्या या कार होणार बंद –
२०१८ मध्ये टाटा  आपल्या पोर्टफोलिओत बदल करणार आहे. टाटा  कंपनीने ३ मॉडेल्स बाजारात न आणण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिका , बोल्ट, इंडिगो २०१८ मध्ये या गाड्या बंद होतील.