कोरोना संकटात टाटा समूह देशाच्या मदतीला, Oxygen तुटवडा दूर करण्यासाठी करणार मदत, PM मोदीकडून कौतुक

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर टाटा उद्योग समूहाने जनतेच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 24 क्रायोजेनिक कंटेनर आयातीची घोषणा टाटा समूहाने केली आहे. कोरोना विरुध्दच्या लढ्याला हातभार लावण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ऑक्सिजनचे संकट कमी करण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचे टाटा समुहाने म्हटले आहे. दरम्यान टाटा समूहाच्या या घोषणेनंतर काही मिनिटांतच पंतप्रधान नरेंद्र मोदीनी ट्विट केले आहे. टाटा समूहाचा हा दयाळूपणा अतिशय प्रशंसनीय असल्याचे म्हणत त्यांनी कौतुक केले आहे . आपण सगळे भारतीय कोरोना विरोधात एकत्रितपणे लढा देऊ असे त्यांनी म्हटले आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातही सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. मात्र ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाल्याने अख्खा देश या संकटाशी झगडत आहे. अशा परिस्थितीत टाटा समूहाने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 24 क्रायोजेनिक कंटेनर आयातीची घोषणा केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून टाटा समूहाने याची माहिती दिली आहे. ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टाटा समूहाकडून 24 क्रायोजेनिक कंटेनर चार्टर्ड फ्लाइट्सने आयात करणार असून देशातील ऑक्सिजनची कमतरता कमी करण्यास मदत करत असल्याचे म्हटले आहे. तत्पूर्वी टाटा स्टीलच्या वतीने दररोज 300 टन ऑक्सिजन पुरवण्याची घोषणाही केली होती. टाटा उद्योग समूहानं याआधीही कोरोना संकटाशी लढण्याकरता 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.