‘कोरोना’च्या संकटादरम्यान टाटा समूह पाळणार आपला ‘हा’ शब्द 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाने जगभरात उच्छाद मांडला आहे. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक क्रियाकलापांवर मोठा परिणाम झाला आहे. या संकटात सर्वाधिक फटका बसलेल्या  उद्योगांना कामगार कपात, वेतन कपात करावी लागत आहे. मात्र अशा परिस्थितीतसुद्धा भारतातील दिग्गज टाटा समूह दिलेला शब्द पाळणार आहे. टाटा स्टीलने ज्या उमेदवारांना नोकरीची ऑफर दिली होती, त्यांना नियोजित वेळेत सेवेत रुजू करून घेणार असल्याची माहिती टाटा स्टीलने दिली .

टाटा स्टीलने एप्रिल आणि मे महिन्यात मॅनेजमेंट ट्रेनीसह ९६ अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केल्या होत्या. जून महिन्यातदेखील कंपनी  आणखी २५ अधिकाऱ्यांची भरती करणार असल्याचे समजते.तसेच मिळालेल्या माहितीनुसार  विविध प्रकल्पांसाठी टाटा स्टीलने ७६ इंटर्नचीदेखील भरती केली आहे. तर पुढील काही आठवड्यात आणखी ९० तांत्रिक इंटर्न कंपनीत रुजू होणार असल्याचे समजते.

दरम्यान, टाटा समूह आपल्या सामाजिक कार्य आणि उपक्रमांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. टाटा स्टीलने जमशेदपूर, कलिंगानगर आणि इतर खाणींमध्ये काम करणाऱ्यांसाठी १२ डॉक्टर्सची भरती केली आहे. जमशेदपूर येथील  उत्पादन प्रकल्पात कंपनीने  ३,००० नव्या कामगारांची भरती केली आहे. दरम्यान, नव्या कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगसंदर्भात कंपनीने बदल केले आहेत, कारण अनेक कर्मचारी लॉकडाऊनमुळे घरून काम करत आहेत. टाटा स्टीलचे मनुष्यबळ विभागाचे उपाध्यक्ष सुरेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पादन प्रकल्पात सध्या कंपनीचे ४० टक्के मनुष्यबळ कार्यरत आहेत. माहितीनुसार प्रत्येक नवा कर्मचारी एक दिवसीय ओरिएंटेशन कार्यक्रमात सहभागी होतो. वरिष्ठ नेतृत्व  नव्या कर्मचाऱ्यांना वेबिनार आणि इतर संवादाद्वारे नियमित मार्गदर्शन करत आहे.