Pune : हिंजवडीतील IT कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर येणार ‘संक्रांत’; तब्बल 800 जणांच्या नोकऱ्या धोक्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील हिंजवडी हा भाग ‘आयटी पार्क’ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक मोठ्या आयटी कंपन्या आहेत. त्यातच आता टाटा टेक्नॉलॉजीमधील 800 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी तक्रार दाखल केली आहे.

आयटी कर्मचाऱ्यांची संघटना राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कर्मचारी सिनेटने पुण्यातील कामगार आयुक्तांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्याबाबत हरप्रीत सलुजा म्हणाले, की 1 मार्च 2021 रोजी बेकायदेशीर काम सुरू झाले आहे. या कामांमुळे 800 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. तसेच आयटी कंपनीने जून 2020 मध्ये 400 कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. या सर्व कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत कोणतेही वेतन दिले गेले नाही. सध्या आयटी उद्योगात काम करणारे अनेक कर्मचारी कठीण परिस्थितीतून जात आहेत. त्यामुळे ते भीतीने काम करत आहेत.

दरम्यान, हिंजवडी येथील टाटा टेक्नॉलॉजीच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात अवैधरित्या कामावरून काढून टाकल्याच्या तक्रारी आहेत, असेही सलुजा म्हणाले.