टाटांची TCS मंदीतही देणार 40 हजार तरूणांना रोजगार !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान ‘आपल्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांची काळजी घ्या. कुणालाही नोकरीवरुन काढून टाकू नका’ असे आवाहन केले होते. तरीही देशातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले होते. तसेच काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात केली होती. पण अशा संकटाच्या वेळी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने देशभरातील कॅम्पसमधील ४० हजार फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात फ्रेशर्सना नोकऱ्या दिल्या होत्या. कोरोना संसर्गा सारख्या महामारीच्या काळातही टीसीएसनं भरती काढल्याने ती महत्वाची मानली जात आहे. सध्या आर्थिक संकटात असलेल्या अनेक कंपन्या एक तर कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकत आहेत, तर काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करत आहेत, मात्र टीसीएसने यापैकी काही सुद्धा न करता उलट नव्याने भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

अमेरिकेत नोकरीची दुप्पट संधी

टीसीएसने अमेरिकेत कॅम्पस प्लेसमेट्स मध्ये यावर्षी दुप्पट नोकरभरती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भात टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथ यांनी म्हटलं की, “मागणीतील सकारात्मक वातावरण पाहून कंपनी हळूहळू रोजगार उपलब्ध करुन देण्यात सुरुवात करत आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ते थांबवण्यात आले होते, पण आम्ही आमच्या सर्व योजनांचे पालन करण्यात कटिबद्ध आहोत.”

टीसीएस चा नफा झाला कमी

मागील आठवड्यात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार टीसीएसचा नफा एप्रिल ते जून या तिमाहीत १३ टक्क्यांनी घसरुन अवघ्या ७,०४९ कोटी रुपयांवर आला आहे. हे कोरोना संसर्गाच्या संकटामुळे झालेलं नुकसान आहे.

कॅम्पस हायरिंगमध्ये मोठी घट

यावर्षी महाविद्यालयांमध्ये कॅम्पस हायरिंग ८२ टक्क्यांनी घटल्याचं Firstnaukri.com सर्वेक्षणानुसार समोर आलं आहे. तसेच प्री-फायनल वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपमध्ये ७४ टक्क्यांनी घट झाली आहे. सर्वेक्षणानुसार ४४ टक्के ऑफरची जॉयनिंग डेट पुढे ढकलण्यात आली आहे, तर केवळ ९ टक्के ऑफरचं मागे घेण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणात सामील झालेल्या जवळपास ३३ टक्के कर्मचाऱ्यांचे मत आहे की, वरिष्ठ अधिकारी त्यांना नोकरीच्या स्थितीबाबत कोणती देखील माहिती देत नाहीत.