Tauktae Cyclone : धडाम, आवाज झाला अन् घराचे पत्रे नातवावर पडणार, इतक्यात… सुपरहिरो ठरलेल्या आजोबांनी सांगितला वादळाचा थरार

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – तोक्ते चक्रीवादळामुळे कोकण किरनारपट्टयात मोठे नुकसान झाले आहे. कोकणात कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी झालेल्या या चक्रीवादळाने कोकणाला झोडपून काढले. तोक्ते हे चक्रीवादळ रत्नागिरी तालुक्यातील कार्ले या गावातील कलंबटे कुटुंबासाठी जीवघेणे ठरणार होते. मात्र, कुटुंबातील 70 वर्षीय आजोबांनी दाखवेल्या प्रसंगावधानामुळे पाच वर्षाच्या नातवाचा जीव वाचला. यामध्ये ते जखमी झाले आहेत. परंतु नातवाला वाचवू शकलो याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

तोक्ते चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संकटातून नातवाचे कसे प्राण वाचवले याचा थरार 70 वर्षीय अशोक कलंबटे यांनी सांगितला. संध्याकाळी पाच वाजताची वेळ होती. बाहेर वारा जोरात होता. आम्ही सर्वजण घरातच होतो. पावसामुळे बाहेर जाणे टाळले होते. माझा पाच वर्षाचा नातू वेदांत हा घरात खेळत होता. काही वेळाने मी देवासमोर दिवा लावण्यासाठी गेलो. इतक्यात धडाम असा मोठा आवाज आला. आमच्या घरासमोरील मोठं झाड घरावर कोसळलं होतं. घराचे पत्रे फुटत होते. माझे डोळे वेदांतला शोधत होते. तेवढ्यात मला वेदांत दिसला.

वरुन पत्रे कोसळत असताना वेदांत त्याच खोलीच्या दिशेने जात होता. मी क्षणाचाही विलंब न करता वेदांच्या दिशेने धाव घेतली. त्याला मागे खेचले अन् पोटाखाली घेतलं. तोच माझ्या अंगावर पत्रे पडले. माझ्या पाठिला मार लागला, पण माझा नातू सुखरुप असल्याचे मला समाधान असल्याचे अशोक कलंबटे यांनी सांगितले. जर मी वेदांतला खेचलं नसतं तर कोण जाणे काय झालं असतं. आम्हाला या प्रसंगाची कल्पना देखील करवत नाही. काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले असते. आमच्या घरावर झाड कोसळून आमचा संसार मोडला, पण नातवाला वाचवल याचं समाधान आहे. चक्रीवादळाने आमचा संसार हिरावला. सध्या आम्ही शेजाऱ्यांकडे रहात आहोत. आता लाखोंचा खर्च करावा लागणार आहे. पण आमचा नातू सुखरुप आहे, असे अशोक कलंबटे यांनी सांगितले. हा प्रसंग सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यांचा आवाज घोगरा झाला होता, श्वास फुलला होता.

पाच वर्षाच्या वेदांतने देखील आजोबांनी सांगितलेला प्रसंग पुन्हा सांगितला. धडाम आवाज आला. खिडकीतून पाहिले तर झाड घरावर पडले होते. वरून पत्रे खाली पडत होते. तेवढ्यात आजोबांनी माला जोरात ओढत आपल्या पोटाखाली घेतलं. आजोबांच्या पाठीला लागलं. आजीच्या डोक्याला टाके पडले आणि माझ्या हातालाही थोडा मार लागला, असे सांगताना तो आजोबांच्या कुशीत शिरला.

वेदांच्या आजीने सांगितले की, आम्ही मोठ्या कष्टाने हा संसार उभा केला होता. पण चक्रीवादळ आलं अन् सारं घेऊन गेला. गावातील नागरिकांनी झाड तोडण्यासाठी मदत केली. मात्र, त्यांना देखील काही मर्यादा आहेत. सर्व गेलं पण समाधान एकच आहे ते म्हणजे आमचा नातू या प्रसंगातून सुखरुप बचावला. बाकी काहीही नको, असे सांगताना आजीचे पण डोळे देखील पाणावले.