निलेश राणेंचे CM ठाकरेवर टीकास्त्र, म्हणाले – ‘पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर तुमचे आज जगात कारखाने असते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  तौक्ते चक्रीवादळाचा राज्याला मोठा तडाखा बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान कोकण किनारपट्टीवरील नागरिकांचे झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा केला. यावेळी नुकसान झालेल्यांना लवकरच मदत जाहीर करू असे, मुख्यमंत्री म्हणत असले तरी तरी अद्याप ठोस मदत मिळाली नाही. याच मुद्द्यावरून माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. अजून एक पोकळ आश्वासन…पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते. 10 दिवस झाले एक कवडी दिली नाही, अनेक गावात अजूनही लाईट नाही, रॉ मटेरियल नाही पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषी सारखे तारखा देत असल्याचा घणाघात राणेंनी केला आहे.

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आदी 7 जिल्ह्यांव्यतिरिक्त तौक्तेचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनाही ही मदत दिली जाईल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी व राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीच्या निकषांच्या बाहेर जाऊन निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदत दिली होती. तोच निकष या ठिकाणी असेल. मदतीपासून कुणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात 695 गावांना वादळाचा फटका बसला आहे. 2500 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. 26, 358 नागरिकांना फटका बसला. दोघांचा मृत्यू झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात 1820 गावांमध्ये फटका बसला. 1550 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. 27,798 नागरिकांना फटका बसला आहे. चौघांचा मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 640 गावांना फटका बसला. 6, 652 घरांचे अंशतः तर 23 घरांचे पूर्णत: नुकसान झाले. 3.375 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. 15,644 नागरिकांना फटका बसला आहे. तिघांचा मृत्यू झाला आहे.