नवीन आर्थिक वर्षात ‘हे’ कामे करा, अन्यथा भरावा लागेल दुप्पट Tax

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2021-22 साठी अर्थसंकल्प सादर केला. यात आयकर प्रणालीत अनेक मोठे बदल केले असून 1 एप्रिल पासून ते लागू होणार आहेत. यात काही नियमांपासून दिलासा मिळाला आहे, तर काहीमध्ये अशा तरतुदी आहेत की, थोडयाशाही चुका झाल्या तर दुप्पट कर भरावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन वर्षात आयकर संबधित नियमांची काळजी घ्यावी लागणार आहे.

1) …तर दुप्पट टीडीएस भरावा लागणार
ITR फाईल न केल्यास करदात्यांना दुप्पट TDS भरावा लागणार आहे. आयटीआर फाईल न करण्याऱ्यांसाठी हा नियम कडक केला आहे. तसेच त्यांना टीसीएसदेखील जास्त आकारण्यात येणार आहे. नवीन नियमांनुसार, ज्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल नाही केले, त्यांच्यावर टॅक्स कलेक्शन ॲक्ट सोर्स देखील जास्त लागू होईल. नवीन नियमांनुसार, पीनल टीडीएस आणि टीसीएलचे दर 1 जुलै 2021 पासून 10-20 टक्के असतील. हे सहसा 5-10 टक्के असते.

2) ईपीएफमध्ये 2.5 लाखांपर्यंत गुंतवणूकच टॅक्स फ्री
2021-22 च्या अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून मिळालेल्या व्याजावर टॅक्स जाहीर केला आहे. संसदेत अर्थसंकल्प मंजूर होताच नवीन आर्थिक वर्षापासून एका आर्थिक वर्षात 2.5 लाखापर्यंतची ईपीएफमधील गुंतवणूक टॅक्स फ्री होईल. त्यापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास तुम्हाला अतिरिक्त रकमेसाठी आपला विचार केला जाईल.

3) LTC स्कीमचा फायदा
नवीन आर्थिक वर्षात ट्रॅव्हल लीव्ह कन्सेशन (एलटीसी) कॅश व्हाउचर योजना लागू होईल. कोरोनामुळे लागू केलेल्या प्रवासी बंदीमुळे एलटीसी टॅक्स लाभ न मिळालेल्या कर्मचार्‍यांसाठी ही योजना सुरू केली गेली आहे.

4) आयटीआर फाईल करण्यापासून सूट
1 एप्रिल 2021 पासून 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयटीआर न भरण्याची सूट अर्थसंकल्पात प्रस्तावित केली आहे. निवृत्तीवेतन किंवा मुदत ठेवींवरील व्याजावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ही सूट दिली आहे.

5) आयकर भरण्याची प्रक्रिया सोपी
इंडिव्हिज्युअल टॅक्सपेअर्संना आता 1 एप्रिल 2021 पासून प्री-फील्ड आयटीआर फॉर्म दिला जाणार आहे. कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी आणि इन्कम टॅक्स रिटर्न करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.