संसदेवर दहशतवादी हल्लासदृश्य परिस्थिती ; एकच तारांबळ… अन् सुटकेचा निःश्वास 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेचे सुरक्षा कवच भेदून लाल दिव्यांची एक ऍम्बेसेडर कार संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरली होती. त्याच गाडीतून एका दहशतवाद्याने हॅण्डग्रेनेडचा स्फोट केला होता आणि स्वत: ला उडवून दिलं होतं अशीच काहीशी घटना आज पुन्हा संसदेच्या आवारात घडली. संसदेचे अधिवेशन सुरु होण्याच्या काही मिनिटे आधी संसंद भवनाच्या बाहेर बॅरिकेडला एका खासगी टॅक्सीने धडक दिल्याने संसद परिसरात एकच खळबळ उडाली.मात्र खासदारांकडून वापर करण्यात येत असलेली ही खासगी कार असल्याचं लक्षात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
अलर्ट जारी
संसदेचं अधिवशेन सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी संसंद भवनाच्या बाहेर बॅरिकेडला एका खासगी टॅक्सीने धडक दिल्याने संसद परिसरात एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे सुरक्षा जवान तात्काळ सतर्क झाले आणि या परिसरात अलर्ट जारी करण्यात आला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे १७ वर्षांपूर्वी झालेल्या संसदेवरील हल्ल्यासारखीच परिस्थिती निर्माण होते की काय? अशी धाकधूक सर्वांच्याच मनात निर्माण झाली होती. पण ही खासदाराकडून वापरण्यात येणारी ही खासगी कार होती त्यामुळे सर्वानी सुटकेचा निःश्वास टाकला.
आज सकाळी ही घटना घडली. संसद भवनाबाहेरच्या बॅरिकेड्सला खासगी कार धडकल्याची माहिती मिळाल्यानंतर संसद परिसरातील सर्वच सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले. सीआरपीएफच्या क्विक अॅक्शन टीमने तात्काळ संसदेच्या गेटवर पोझिशन घेतली आणि प्रवेशद्वाराला संपूर्णपणे घेराव घातला. त्यानंतर काही जवानांनी कारची तपासणी केली. चौकशीत खासदार वापर असलेली ही खासगी कार असल्याचं आढळून आलं. संपूर्ण खातरजमा झाल्यानंतर काही वेळाने परिस्थिती निवळली. त्यानंतर जारी करण्यात आलेला अलर्टही रद्द करण्यात आला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस असून संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे. राफेलप्रकरणी लोकसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषअधिकार हननाच्या तीन नोटीसा देण्यात आल्या आहेत. तर टीएमसीने राज्यसभेत नियम २६७ अंतर्गत बेरोजगार तरुणांना नोकरी आणि रोजगार देण्यावरून चर्चा घडवून आणण्यासाठी नोटीस दिली आहे.
असा झाला होता संसदेवर हल्ला 
१३ डिसेंबर २००१…..भारतीय संसदेच्या इतिहासातला काळा दिवस…भारतीय लोकशाहीवरचा सर्वात मोठा हल्ला.. वेळ सकाळी ११ वाजून ४० मिनिटं… लाल दिव्यांची एक ऍम्बेसेडर कार संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरली. कारवर गृहमंत्रालयाचं आणि संसदेचं स्टिकर असल्याने अतिशय कडक सुरक्षेचं कवच भेदून ही कार थेट आत शिरली. मुख्य गेटच्या आतमध्ये शिरल्यावर कारमधल्या एका दहशतवाद्याने हॅण्डग्रेनेडचा स्फोट केला आणि स्वत: उडवून दिलं. इतर दहशतवाद्यांनी एके ४७ रायफलमधून अंधाधुंद गोळीबार सुरू केला. तोपर्यंत हा दहशतवादी हल्ला असल्याचे सर्वांच्या लक्षात आलं.
अधिवेशन सुरू असल्याने खासदार मंत्री आणि व्हीव्हीआयपी (VVIP) ची संसदेत उपस्थिती होती. हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी बाहेर पडल्या होत्या. उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्यासह १०० पेक्षा जास्त खासदार सेंट्रल हॉल आणि परिसरात होते. हल्ला करून खासदार आणि मंत्र्यांना ओलीस ठेवण्याची दहशतवाद्यांची योजना होती. सुरक्षा कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान दाखवत सेंट्रल भवनाचे दरवाजे बंद केले आणि मोठा अनर्थ टळला.कारमध्ये असलेल्या ५ कडव्या दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे संसद परिसराला युध्दाचं रूप आलं होतं. सुरक्षा जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत पाचही दहशतवाद्यांना ठार केलं आणि अर्धा तास चालंलेलं हे थरार नाट्य अखेर संपलं. यात ७ जवान शहीद झाले. तर २कर्मचार्‍यांचा गोळीबारात मृत्यू झाला. आता अफझल गुरूच्या फाशीने या शहिदांना खर्‍या अर्थाने श्रध्दांजली मिळालीय.
You might also like