क्षयरोग दिन जनजागृती रॅली क्षयरोगाचे प्रमाण वाढतेय : डॉ. फुलारी

पोलीसनामा ऑनलाईन – क्षयरोगावर लवकर व पूर्ण उपचार घेतले तर तो पूर्णपणे बरा होतो. पण बदलती जीवनशैली व आरोग्याकडे दुर्लक्ष या कारणांमुळे क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी म्हणाले. दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला, वजन कमी होणे, भूक मंदावणे, संध्याकाळी ताप येणे, छातीत दुखणे, अशी लक्षणे आढळल्यास थुंकीची तपासणी करावी. फुफ्फुसाबरोबर हाडे सांध्याचा क्षयरोग, लसीकाग्रंथीचा क्षयरोग, मेंदूचा क्षयरोग, आतड्यांचा क्षयरोगही होतो. जर क्षयरोगाचा योग्य उपचार घेतला नाही, तर भयंकर असा एमडीआर टीबी होण्याची दाट शक्यता असते, असे डॉ. फुलारी म्हणाले.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने लातूर शहरातून क्षयरोग जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच निबंध स्पर्धेतील बक्षीस वितरणासह कर्मचाऱ्यांचा गौरव येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, जागतिक आरोग्य संघटनेचे समन्वयक डॉ. संजय सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रज्योती धनगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे, आयएमएचे अध्यक्ष तथा क्षय व उरो विभागाचे प्रमुख डॉ. रमेश भराटे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. आर. शेख, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील, माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावसाहेब वाघमारे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव, डॉट्स प्लस साईट वरिष्ठ अधिकारी डॉ. मनोज कदम, डॉ. अनिलकुमार जाधव, क्षयरोग कार्यालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर क्षयरोग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच एमडीआर-एक्सडीआर रुग्णांसाठी सेवा करणाऱ्या वॉर्डमधील कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.