पुणे ते लोणावळादरम्यान महिलेचा विनयभंग, रेल्वे टीसीला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चेन्नईहून मुंबईला येणाऱ्या एकट्या महिलेला पाहून एक्सप्रेसमधील कर्तव्यावर असलेल्या टीसीने महिलेसोबत अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केला. एच. मीना असे या टीसाचे नाव असून त्याच्या विरुद्ध दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये त्याला पोलिसांनी अटक केली असून हा गुन्हा पुणे ते लोणावळा दरम्यान घडल्याने हा गुन्हा पुणे रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

पीडित महिला ही चेन्नई-दादर एक्सप्रेसमधून मुंबईला जात होती. ती एस ८ या डब्यातून प्रवास करत होती. यावेळी इतर प्रवासी देखील या डब्यातून प्रवास करीत होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास रेल्वे पुणे स्थानकात आली असता डब्यातील इतर प्रवसी खाली उतरले. यावेळी महिला डब्यामध्ये एकटीच होती. पुणे स्थानक सोडल्यानंतर एच. मीना या टीसीने महिला एकटी असल्याची संधी साधत तिच्याकडे पाहून अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केला. तसेच तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या महिलेने नातेवाईकांना फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रेल्वेच्या १८२ या हेल्पलाईनवर संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली.

नियंत्रण कक्षातून चेन्नई एक्स्प्रेसमध्ये तैनात करण्यात असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना तातडीने एस ८ क्रमांकाचा डब्याकडे जाण्याचे आदेश दिले. आरपीएफ जवानांनी लोणावळा स्थानकात टीसीचा शोध घेतला अखेर कल्याण स्थानकातून एक्स्प्रेस रवाना झाल्यानंतर आरपीएफ जवानांनी टीसीला ताब्यात घेतले. या प्रकरणी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, गुन्हा पुणे ते लोणावळा दरम्यान घडल्याने प्रकरण पुणे रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणामुळे लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे.