TDP नेत्याचा खळबळजनक आरोप; म्हणाले – ‘तिरुपती मंदिरात दान केल्या जाणाऱ्या केसांची चीनला विक्री’, राजकारण तापलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आणि जगातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुपती मंदीर ट्रस्टवर तेलगू देशम पक्षाने गंभीर आरोप केला आहे. तिरुपती मंदिरात भक्तांकडून दान केल्या जाणाऱ्या केसांची चीन, म्यानमार, थायंडमध्ये तस्करी केली जात असल्याचा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे माजी मंत्री आणि TDP चे नेते अयन्ना पत्रुदु यांनी केला आहे. केसांच्या तस्करीमध्ये सत्ताधारी पक्ष वायआरएस काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. तसेच वायएसआर काँग्रेसचे नेते रेती, सिमेंट आणि दारूसोबतच केसांचीही तस्करी करत असून त्यांची माफीयागँग आता उघडकीस आल्याचे पत्रुदु म्हणाले. दरम्यान तिरुपती मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टने TDP ने केलेल्या केसांच्या तस्करीबाबतच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

मिझोराम-म्यानमार सीमेवर तैनात असलेल्या आसाम रायफल्सच्या जवानांनी नुकतेच तब्बल 2 कोटींचे माणसांचे केस जप्त केले होते. याचाच दाखला देत TDP ने सत्ताधारी पक्षावर घणाघात केला आहे. तिरूपती मंदिरातील केस हे सुरुवातीला म्यानमारला पाठवले जातात. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी ते थायलंड आणि चीनला पाठवले जातात असा आरोप पत्रुदु यांनी केला आहे. या केसांचा उपयोग विग बनविण्यासाठी केला जातो आणि याचा व्यापार जगभरात पसरल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकारावर जगनमोहन रेड्डी सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी TDP ने केली आहे. केस माफिया टोळीवर अंकुश ठेवण्यात सरकार अपयशी का ठरत आहे?, असाही सवाल त्यांनी केला आहे. भक्तांनी दान केलेल्या केसांच्या तस्करीला मदत करुन वायआरएस काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदुंच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. जगभरातून लाखो भाविक येथे येत असतात. देवावरील श्रद्धेपोटी ते आपले केस दान करतात. पण सत्ताधारी पक्षाचे नेते मंदिराच्या प्रतिमेला ठेच पोहोचविण्याचे काम करत असल्याचे पत्रुदु यांनी म्हटले आहे.