पुण्यात शिक्षकाचा डर्टी पिक्चर ! १२ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे, शिक्षकाला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींशी मधल्या सुट्टीत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. मागील सहा महिन्यांपासून शिक्षकाकडून हा प्रकार सुरु होता. त्याने विद्यार्थिनींना हा प्रकार कोणाला न सांगण्याची धमकी दिली होती. दरम्यान याप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे तक्रार गेल्यानंतर त्यांनी चौकशी करून विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

विक्रम शंकर पोतदार (वय ४२, रा. लोहगाव) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्याविरोधात विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकारी निलीमा मधूकर म्हेत्रे (वय ४३, रा. जेजूरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम पोतदार हे लोहगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून काम करतो. मागील ६ महिन्यांपासून इयत्ता सहावीत शिकणाऱ्या मुलींना मधल्या सुट्टीत बोलवून त्यांच्याशी अश्लील प्रकार ते करत होते. इयत्ता ६ वी तील १२ विद्यार्थीनींसोबत हा प्रकार घडत होता. त्यासोबतच त्याने या मुलींसोबत अश्लील कृत्य केल्यानंतर त्यांना याची वाच्यता न करण्याबाबतही धमकावले होते.

दरम्यान विद्यार्थीनीही यासंदर्भात तक्रार करण्यास धजावत नव्हत्या. परंतु केंद्रप्रमुखांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. याची माहिती केंद्र प्रमुखांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यावेळी हवेली पंचायत समितीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी निलिमा म्हेत्रे यांनी यासंदर्भात विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक चौधरी पुढील तपास करत आहेत.