तारीख ठरली ! ‘या’ दिवशी होणार शिक्षक पात्रता परीक्षा (TET)

इगतपुरी (नाशिक) : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत समाविष्ट होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा २२ सप्टेंबरला घेण्यात यावी असे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी शासनाकडे परवानगी मागण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे राज्यात २०१०पासून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु झालेली नाही.

शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या व नियुक्ती दिलेल्या शिक्षकांचे वेतन बंद करून त्यांना सेवेतून कमी करण्याबाबतचे आदेश यापूर्वी प्रशासनाने दिले होते. दरम्यान, राज्य शासनाने अशा नियुक्त झालेल्या शिक्षकांना अजून एक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने यापूर्वी आदेश दिले आहेत. राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक भरतीच्या दृष्टीने आणि सेवेत असलेल्या व पात्रता धारण न केलेल्या शिक्षकांसाठी ही शेवटची संधी असल्याने ही परीक्षा खूप महत्वाची आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्य शासनातर्फे अनेक जिल्हा परिषदांनी मध्यंतरीच्या काळात शिक्षक भरतीस स्थगिती असतानाही शिक्षक मान्यता दिल्याचे समोर आले आहे.

म्हणून २२ सप्टेंबर ही तारीख प्रस्तावित –

जून, जुलै, ऑगस्ट या कालखंडात पावसाळ्याचे दिवस असल्याने राज्यभर परीक्षा घेणे, त्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देणे अडचणीचे ठरू शकते. म्हणून २२ सप्टेंबर ही तारीख प्रस्तावित करण्यात आली आहे.

भरती नाही तरीही परीक्षा सुरूच –

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचे अधिकार राज्य परीक्षा मंडळाला असून, वर्षातून एकदा ही परीक्षा घेण्याचे प्रस्तावित धोरण आहे.
२०१३ नंतरच्या शिक्षक भरती प्रक्रियेला ही पात्रता अनिवार्य करण्यात आली. राज्यात आजही पाऊणलाख विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण आहेत. गेली सहा वर्षे शिक्षक भरती झाली नाही. शिक्षक पदाच्या नोकरीसाठी आवश्यक ‘महाटीईटी’ परीक्षांचा मात्र सपाटा सुरू आहे. प्रारंभी काही लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र, यश मिळत नसल्याने अनेकांनी हा मार्ग कायमचाच बंद केला.