समाजाच्या जडणघडणीत शिक्षक मोलाचा घटक – शेषाद्रीअण्णा डांगे

पुणे – कोरोनाच्या कठीण काळामध्ये विद्या भारतीच्या शाळांतील शिक्षकांनी मोलाचे कार्य केले. विद्या भारतीच्या शाळा सेवा म्हणून कार्यरत आहेत. समाज घडविण्यात शिक्षकांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची गरज आहे, असे विद्याभारती पश्चिम क्षेत्रचे मंत्री शेषाद्रीअण्णा डांगे यांनी सांगितले.

विवेक व्यासपीठ, मुंबई आणि वृंदावन फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुजनांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, डेक्कन येथे केले होते. याप्रसंगी विद्याभारती पश्चिम क्षेत्र मंत्री शेषाद्रीअण्णा डांगे, माणुसकीच्या शोधात भटकंती करणारे अवलिया व्यक्तिमत्त्व रियाज सय्यद, बाबासाहेब चितळे महाविद्यालय, भिलवडीचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे, संत चोखामेळा अध्यासन केंद्र पुणेचे प्रा. अर्चना खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अकरा गुरुजनांचा गौरव करण्यात आला.

अवलिया व्यक्तिमत्त्व रियाज सय्यद म्हणाले की, शिक्षक हा जात-धर्म मानत नाही. विद्यार्थी हा त्यांच्यासाठी केंद्रबिंदू असतो. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो, हे मी स्वतः अनुभवले आहे. गुरुजनांचा आदर करणे ही आपली संस्कृती आहे, ती जोपासली पाहिजे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

सांगलीतील (भिलवडी) बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांनी सांगितले की, डॉ. श्रीपती शास्त्री यांनी दिलेला गुरुमंत्र म्हणून दरवर्षी पाच हजार रुपयांची पुस्तके खरेदी करून ग्रंथालयाला भेट देण्याचा संकल्प केला असून, तो आजपर्यंत कायम राखला आहे. प्रत्येक शिक्षकाने गरजू आणि होतकरू विद्यार्थ्याला मदतीचा हात दिला पाहिजे. त्यातून विद्यार्थी घडत समाज घडविण्यास मोलाचा हातभार लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वृंदावन फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक सचिन पाटील यांनी प्रास्ताविक केले. वारकरी सांप्रदायाचे प्रसाद महाराज मेटे यांनी सूत्रसंचालन केले. एसएनडीटी विद्यापीठाचे सहायक कुलसचिव अमेय महाजन यांनी आभार मानले.