डान्स शिकविण्याच्या बहाण्याने वर्गशिक्षकाचे विद्यार्थीनींशी अश्लील चाळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हडपसर येथील एका शाळेत किळसवाना प्रकार समोर आला आहे. शाळेतील वर्गशिक्षकानेच डान्स शिकविण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनींच्या खासगी भागांना हात लावून त्यांना अश्लील व्हिडीओ दाखवून तसा प्रकार तुझ्या घरी येऊन त्यांच्यासोबत करण्याची धमकी दिली. हा प्रकार विद्यार्थिनीने घरी येऊन आईला सांगिल्यानंतर समोर आला. याप्रकरणी तेरा वर्षीय पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार वर्गशिक्षकावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामेश्वर राठोड(रा. खराडी चंदननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी या धुणीभांडीचे काम करतात.तर त्यांचे पती ड्रायवर आहेत. त्यांना तीन आपत्ये आहेत. त्यांची मोठी मुलगी तेरा वर्षांची आहे. ती हडपसर येथील माळवाडी परिसरात असलेल्या एका शाळेत सहावीच्या वर्गात शिकते. तिची शाळेची वेळ दुपारी बारा ते सायंकाळी साडेपाच आहे. दरम्यान गुरुवारी ती घरी आल्यावर तिने त्यांना सांगितले की, आमचे वर्गशिक्षक रामेश्वर राठोड सर डान्स शिकविण्याच्या बहाण्याने मला व माझ्या मैत्रिणींच्या खासगी जागेत हात लावतात. तसेच आम्हाला वर्गात घाणेरडे व्हीडीओ दाखवतात. ही बाब कोणाला सांगितल्यास तसा प्रकार तुझ्या घरी येऊन करेन असे बोलतात.

तसेच आम्ही एखादा प्रश्न विचारण्यास गेल्यावर आमच्या खासगी भागांवरून हात फिरवतात. ते गेल्या एक महिन्यांपासून आमच्या वर्गातील मुलींसोबत हा प्रकार करत आहेत. त्यानंतर फिर्यादी महिलेने याची खात्री करण्यासाठी शाळेत धाव घेतली. पिडीत मुलीच्या वर्गमैत्रिणीलाही याबाबत विचारणा केल्यावर दोन आठवड्यापुर्वी राठोडने असाच प्रकार तिच्यासोबत केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर महिलेने पतीला बोलावून हा प्रकार सांगितला. तसेच शाळेतील टिच फॉर इंडीया फेलो मधील दोन महिलांना याबाबत सांगितल्यावर त्यांनी एका एनजीओच्या दोन महिलांना कळविले. त्यांनी मुलींकडे येऊन चौकशी केल्यावर त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. रामेश्वर राठोड हा वर्गातील सर्वच मुलींसोबत हा किळसवाणा प्रकार करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.