10000 रुपयाची लाच घेताना शिक्षण विस्ताराधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मंगळवेढा/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शैक्षणिक संस्थेविरोधात केलेल्या तक्रारीच्या खुलाशाचा अहवाल समाधानकारकरीत्या देण्यासाठी मंगळवेढा पंचायत समितिच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई मंगळवारी (दि.17) सायंकाळी पाचच्या सुमारास गटशिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली. लक्ष्मीकांत प्रभाकर कुमठेकर (वय-45) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे शैक्षणीक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांच्या शैक्षणिक संस्थेविरोधात केलेल्या तक्रारीनंतर खुलाशाचा अहवाल समाधानकारकरीत्या देण्यासाठी कुमठेकर याने तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने पडताळणी केली असता कुमठेकर याने गटशिक्षणाधिकारी कार्यालयात लाच घेण्याचे मान्य केले. लाचलुचपत विभागाने सापळा रचून तक्रारदाराकडून लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. कुमठेकर याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/