पंढरपुरात विद्यार्थीनींवर बलात्काराच्या दोन घटना, शिक्षक आणि शेजाऱ्याचे कृत्य

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन विद्यार्थीनींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने पंढरपूर हादरून गेले आहे. एका घटनेत नराधम शिक्षकानेच हे कृत्य केले असून गुरुशिष्याच्या नात्याला काळिमा फासला आहे. इयत्ता नववीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीवर तिच्या शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तर दुसऱ्या घटनेत शेजाऱ्याने विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही घटनांमुळे अवघे पंढरपूर हादरून गेले असून पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुपली येथील एका शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीला शिक्षक नंदकुमार कोळवले याने भेटण्यासाठी बोलावून तिला जीपमध्ये बसवून अकलूज येथे नेले. तेथे त्याने या विद्यार्थीनीवर पाशवी अत्याचार केले. घडलेला हा प्रकार मुलीने घरच्यांना सांगितला. परंतु, समाजात अब्रू जाईल या भितीपोटी त्यांनी झाल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. यानंतर नराधम शिक्षकाने सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे बदली करून घेतली. बदली झाल्यानंतही तो या मुलीला धमकावत होता. त्यातच या मुलीवर केलेल्या अत्याचाराचे फोटो व्हायरल झाल्याने त्याच्या कृत्याला वाचा फुटली. यांनतर निर्भया पथकाने मुलीच्या घरच्यांचे समुपदेशन केल्यानंतर तिच्या पालकांनी नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला.

संतापाची बाब म्हणजे या नराधम शिक्षकावर शाळेने मात्र अजून कोणतीही कारवाई केलेली नाही. विद्यार्थीनीवर शिक्षकाने बलात्कार केल्याची ही घटना ताजी असतानाच गार्डी येथील शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने अत्याचार केल्याची दुसरी घटना घडली आहे. राहुल फाटे असे या नराधमाचे नाव आहे. त्याने या अल्पवयीन विद्यार्थीनीला शेतात बोलावून तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी या नराधमावर कारवाई केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या दोन्ही घटनांत पंढरपूर ग्रामीण पोलिसांत पोस्कोसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

केरळच्या माजी मुख्यमंत्र्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा