शिक्षकांकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – किरकोळ कारणातून श्रीगोंदा तालुक्यातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला तीन शिक्षकांनी बेदम मारहाण केली. रयत शिक्षण संस्थेच्या काष्टी येथील जनता विद्यालयात प्रकार घडला. याप्रकरणी तीन शिक्षकांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एच. पी. शिंदे, वर्गशिक्षक खामकर व ढवळे (दोघांनी पुर्ण नावे नाहीत) यांचा समावेश आहे. सदर विद्यार्थ्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, जनता विद्यालयातील इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणारा मुलगा चैतन्य बाळासाहेब माने याचे वर्गातील एका मुलासोबत भांडण झाले होते. त्याचा राग येवून तीन शिक्षकांनी चैतन्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे चेतनेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा पडल्या होत्या. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर चैतन्य हा घरी गेला. त्याच्या अंगावरील खुणा पाहून आईने विचारणा केली असता त्याने शाळेतील तीन शिक्षकांनी मारहाण केल्याचे सांगितले. सदर मुलाच्या कुटुंबीयांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी मुलाची आई रूपाली बाळासाहेब माने (रा. आष्टी, ता. श्रीगोंदा) यांच्या फिर्यादीवरून तीन शिक्षकाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Loading...
You might also like