शिक्षकाची शाळेतच विष पिऊन आत्महत्या

तेल्हारा (अकोला) : पोलीसनामा ऑनलाईन – तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील राजीव गांधी विद्यालयातील एका शिक्षकाने शाळेतच विष प्राशन करुन आत्महत्या केली. हा प्रकार शाळेतील इतर शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी (दि.११) दुपारी उघडकीस आला आहे. गजानन नारायण इंगळे (रा. बेलखेड) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

गजानन इंगळे हे नेहमीप्रमाणे शाळेत आले होते. त्यांनी एका दुकानातून लिफाफे विकत घेऊन त्यामध्ये कागदपत्र टाकून ते तळेगाव येथील पोस्टात टाकले. यानंतर ते शाळेच्या प्रयोगशाळेत आले. या ठिकाणी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. हा प्रकार इतर शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांना तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. इंगळे यांची मुलगी पुण्यात असल्याने त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. आज (मंगळवार) त्यांची मुलगी आल्यानंतर त्यांचे शवविच्छदन करण्यात आले. या घटनेची माहिती शाळेचे मुख्याध्यापक अरविंद गिऱ्हे यांनी पोलिसांना दिली.

मृतक शिक्षक गजानन इंगळे व मुख्याध्यापक अरविंद गिऱ्हे यांचा काही दिवसांपासून वाद झाला होता. या दोघांमध्ये नेहमी वाद होत होता. त्यामुळे मृतक गजानन इंगळे यांनी मुख्याध्यापक यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.