भारतीय संघ म्हणजे खासगी मालमत्ता नव्हे, धोनीच्या रिटायरमेंट वरून भडकले क्रिकेटर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघातून सध्या बाहेर फेकला गेलेल्या मनोज तिवारीने एका वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत अतिशय कठोर प्रतिक्रिया दिली आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या निवृत्तीबाबत त्याने अतिशय खडे बोल सुनावले आहेत.

चालू वर्षात इंग्लंड मध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं होतं. तेव्हापासून धोनीच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. धोनी आपली निवृत्ती घोषित करणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यात धोनीने दोन महिने क्रिकेटमधून विश्रांती घेत, निवृत्तीच्या चर्चांवर काही काळ पडदा टाकला.

भारतीय संघातून सध्या बाहेर फेकला गेलेल्या मनोज तिवारीने धोनीच्या निवृत्तीबद्दल कठोर प्रतिक्रीया दिली आहे. भारतीय संघ ही कोणाचीही खासगी मालमत्ता नाही, असं म्हणत मनोज तिवारीने धोनीला आपल्या टिकेचं लक्ष्य बनवलं आहे.

धोनीने आतापर्यंत आपल्या देशासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. भारतीय संघाला सर्वोत्तम बनवण्यामध्येही त्याचं मोठं योगदान आहे. काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकरनेही धोनीने आता विश्रांती घ्यायला हवी असं मत व्यक्त केलं होतं. विराट कोहलीने जरी धोनीची भारतीय संघाला गरज आहे असं म्हटलं असलं तरीही निवड समितीला आता कठोर निर्णय घ्यावा लागेल. निवड समितीने हिंमत दाखवून आता योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे असं तिवारी बोलत होता.

धोनीला कोणत्या आधारावर निवड समिती संघात स्थान देत आहे हे माहित नाही. देशात दुसरेही अनेक गुणवान खेळाडू आहेत, त्यांना संधी मिळणं गरजेचं आहे. धोनीच्या कामगिरीमध्येही आता कमालीची घसरण झाली आहे आणि हे एका किंवा दोन सामन्यांमध्ये होत आले आहे असा मुळीच भाग नाही. जे खेळाडू चांगली कामगिरी करतील तेच संघात राहतील, ज्यांची कामगिरी खराब असेल त्यांना आपली जागा गमवावी लागेल. आपण देशासाठी खेळतोय ही भावना कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे असं तिवारीने धोनीच्या निवृत्तीबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. तिवारीने प्रथमच उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –