महेंद्रसिंह धोनीच्या वेस्ट इंडिज दौर्‍यावर प्रश्‍नचिन्ह !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपनंतर आता भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जात असून यासाठी आज भारतीय संघाची निवड होणार आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समिती भारतीय संघाची निवड करणार आहे.

आज होणाऱ्या संघनिवडीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या दौऱ्यात भारतीय कर्णधार विराट कोहली तसेच निवृत्तीची घोषणा करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याचाही संघात समावेश केला जाणार कि नाही याकडे सर्व क्रीडा रसिकांचे लक्ष लागून आहे. महेंद्रसिंग धोनी हा वर्ल्डकप स्पर्धेनंतर निवृत्त होईल, असे बोलले जात होते, मात्र अजूनपर्यंत धोनीने याविषयी काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे या दौऱ्यावर त्याची निवड होते कि नाही याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

त्याचबरोबर कर्णधार विराट कोहली याच्याकडून देखील कर्णधारपद काढून ते रोहित शर्मा याच्याकडे देण्याच्या चर्चा सुरु असताना सुरुवातीला विराट कोहली हा या दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती मिळत होती. मात्र कर्णधारपदाची टांगती तलवार डोक्यावर असल्याने तो दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत होती. त्यामुळे निवड समिती त्याचा समावेश खेळाडूंमध्ये करते कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या दौऱ्यात भारतीय संघ ३ ते १४ ऑगस्ट दरम्यान वेस्टइंडीजमध्ये ३ टी -२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्याचबरोबर अँटिग्वा आणि जमैका मध्ये दोन कसोटी सामने देखील खेळणार आहे. महेंद्रसिंग धोनी त्याच्याजागी निवड समिती रिषभ पंत याचा विचार करत असून २०२३ च्या वर्ल्डकपच्या दृष्टीने संघाची बांधणी सुरु आहे.

दरम्यान, अजूनपर्यंत धोनीने आपल्या निवृत्तीविषयी काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे तो इतक्यात निवृत्ती स्वीकारणार नाही अशी माहिती पुन्हा एकदा पुढे येत असताना निवड समिती काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loading...
You might also like