महाराष्ट्राच्या मुलींची धडाकेबाज कामगिरी…

नेपियर : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेटमधील पुरुष संघाच्या पाठोपाठ महिला संघानेही न्युझीलंडमध्ये आपली जादू दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय महिलांनी गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. २००६ नंतर भारतीय महिलांनी प्रथमच न्यूझीलंड महिला संघावर न्यूझीलंडमध्ये विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे.

न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करत भारतासमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय संघाची फलंदाज जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने हे लक्ष्य सहज गाठले. महाराष्ट्राच्या या दोन पोरींच्या दमदार कामगिरीमुळे भारताने हा सामना ९ विकेट राखून सहज जिंकला. याचा तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली.

स्मृतीने एकदिवसीय कारकिर्दीतील चौथे शतक पूर्ण केले. स्मृतीने १०४ चेंडूंत १०५ धावा केल्या. त्यात ९ चौकार आणि ३ षटकार खेचले. तर जेमिमाने ९४ चेंडूंत नाबाद ८१ धावांची खेळी केली. जेमिमा रॉडीग्ज आणि स्मृती मानधना पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दोघींनी मिळून १९० धावांची शतकी खेळी करत विक्रम केला आहे. २००३ नंतर भारताच्या पहिल्या विकेटने नोंदवलेली ही पहिलीच शतकी भागीदारी ठरली. २००३ मध्ये अंजू जैन आणि जया शर्मा यांनी १४४ धावांची भागीदारी केली होती.

दरम्यान, या सामन्यात फक्त फलंदाजांनीच नाही तर गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी केली. प्रत्येकी तीन विकेट घेत न्यूझीलंडचा संपूर्ण संघाचा डाव अवघ्या 192 धावांवर गुंडाळला. दिप्ती शर्मा २, शिखा पांडे १ यांची उत्तम साथ लाभली. कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी तिचा हा निर्णय योग्य ठरवला.

https://twitter.com/ICC/status/1088288875934474241