2021 गाजवण्यासाठी टीम इंडियाचे युवा धुरंदर सज्ज; ‘या’ 7 खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आजही संपूर्ण जग कोरोना व्हायरस लढत आहे. तर २०२० हे वर्ष कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यातच गेले. आता परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येत आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी २०२१ मध्ये क्रिकेटची मोठी मेजवानीच ठरणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, टीम इंडियाचे दौरे आणि घरच्या स्टेडियमवर तगड्या संघांसोबतचे सामने… यासाठी खेळाडूच नव्हे तर चाहतेही तयार झाले आहेत.

२०२१ मध्ये टीम इंडियाच्या या ७ युवा शिलेदारांवर सर्वांचे असणार विशेष लक्ष

१) देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) – १२४.८०च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी करणाऱ्या पडिक्कलनं कर्णधार विराट कोहलीपेक्षाही अधिक धावा चोपल्या. डावखुऱ्या फलंदाजानं वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये त्यानं २०१७ मध्ये ५३ चेंडूंत ७२ धावा चोपल्या होत्या. २०१८च्या कूच बिहार ट्रॉफीत ८२९ धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) सलामीवीरानं आयपीएल २०२० गाजवली. यूएईत झालेल्या आयपीएलच्या १३व्या पर्वात त्यानं १५ सामन्यांत ४७३ धावा चोपल्या. RCBकडून सर्वाधिक धावा करण्याचा मानही त्यानं या पर्वात पटकावला.

२) मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) – ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी पदार्पणात जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजनं सर्वांना प्रभाविक केलं. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो ऑस्ट्रेलियातच थांबला आणि त्यानं पदार्पणात ऑसी फलंदाजांची दैना उडवली. आयपीएल २०२०नंतर तो टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला. पण, भारतात त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि तो मायदेशात परतू शकला नाही.

३) प्रियम गर्ग ( Priyam Garg) – भारताच्या १९ वर्षांखालील संघानं दिलेला आणखी एक स्टार खेळाडू. आयपीएल २०२०त त्यानं सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केलं. १९ वर्षांखालील टीम इंडियाचा तो कर्णधार होता आणि त्यानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत संघाला अंतिम फेरीपर्यंत मजल मारून दिली होती. तो ११ वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले.

४) रवि बिश्नोई ( Ravi Bishnoi) – भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा तो सदस्य आहे. त्यानं आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून पदार्पण केलं आणि १४ सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं १७ विकेट्स घेतल्या होत्या.

५) शुबमन गिल ( Shubhman Gill) – २०१८ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत शुबमन गिलला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्यानं छोटेखानी पण महत्त्वाची खेळी करून सर्वांचे मन जिंकले. त्यानं पहिल्या डावात ४५ व दुसऱ्या डावात नाबाद ३५ धावा केल्या.

६) सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) – या खेळाडूला भारतीय संघात स्थान का दिले जात नाही, हा प्रश्न अनेकदा अनेकांनी विचारला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही त्याला टीम इंडियात स्थान मिळाले नाही.

७) टी नटराजन ( T Natarajan) – आयपीएल २०२०मधील दमदार कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या या गोलंदाजानं टीम इंडियात स्थान पटकावले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेट बॉलर म्हणून गेलेल्या टी नटराजनला ट्वेंटी-२०, वन डे आणि आता कसोटी संघातही स्थान पटकावले.