BSNL च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी मोठा ‘दिलासा’ ! 20 एप्रिलपर्यंत ‘रिचार्ज’ नाही केलं तरी नंबर राहणार चालू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे देशभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लढा देत आहे. काही स्वयंसेवी संस्था देखील देशातील असहाय्य् जनतेच्या मदतीसाठी पुढे आल्या असताना आता सरकारी टेलिकॉम संस्था BSNL ने देखील एक पाऊल पुढे उचलत आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बीएसएनएल प्रीपेड सिमकार्ड वापरकर्त्यांचे मोबाईल नंबर कोणत्याही रिचार्जविना 20 एप्रिलपर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

इंसेंटिव म्हणून 10 रुपये बॅलेन्स
याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की , तत्काळ परिणाम म्हणून या वापरकर्त्यांना इंसेंटिव म्हणून 10 रुपये बॅलेन्स देखील देण्यात येईल. कोरोनव्हायरसमुळे देशव्यापी लॉक डाउनमुळे दूरसंचारमंत्र्यांनी ही घोषणा केली. हा आदेश बीएसएनएलच्या प्रत्येक टेलिकॉम सर्कलच्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी लागू असेल. केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे की, 20 एप्रिलपर्यंत लोकांना त्यांच्या कुटुंबियांशी जोडण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला आहे.

TRAI कडूनही सूचना
यापूर्वी ट्राय TRAI ने इतर सार्वजनिक दूरसंचार कंपन्यांनाही अशा सूचना दिल्या होत्या की लॉक डाऊन दरम्यान प्रीपेड वापरकर्त्यांची वैधता वाढवली जावी ज्यांची वैधता कालबाह्य होत आहे. ट्रायने जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलला 21 दिवसांच्या लॉक-डाऊन दरम्यान वापरकर्त्यांना अखंडित सेवा सुरू ठेवण्यास सांगितले. ट्रायने सर्व दूरसंचार कंपन्यांना प्राधान्याच्या आधारावर यासाठी योग्य ती पावले उचलण्यास सांगितले आहे.