2025 पर्यंत प्रत्येक व्यक्ती भारतात खर्च करणार दरमहा 25 GB डेटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीयांचा मोबाइल डेटा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. स्वीडनची दूरसंचार कंपनी एरिक्सनच्या अहवालानुसार 2025 पर्यंत भारतीयांच्या मोबाइल डेटा वापराचे सरासरी प्रमाण 25GB जीबी होण्याची शक्यता आहे. एरिक्सनच्या जून 2020 च्या मासिक अहवालात याचा खुलासा झाला आहे. या अहवालात म्हटले आहे की, भारतात स्मार्टफोन डेटा वापरात मोठी वाढ नोंदवली जात आहे. भारतात स्वस्त स्मार्टफोनची उपस्थिती आणि स्वस्त कॉल रेट हे डेटा वापराच्या वाढीमागील कारण असल्याचे मानले जाते. याशिवाय स्वस्त 4 जी कॉलमुळे भारतीयांच्या डेटा वापरामध्ये वाढ दिसून येत आहे.

तसेच स्वस्त मोबाइल ब्रॉडबँड रेट आणि परवडणार्‍या स्मार्टफोनमुळे लोक मोठ्या संख्येने व्हिडिओ पाहतात, असे या अहवालात समोर आले आहे. यामुळे, येत्या काही काळात डेटा वापर वाढण्याची अपेक्षा आहे. संशोधनानुसार, भारतात फक्त 4 टक्के घरांत निश्चित ब्रॉडबँड आहे, तर बाकीचे 96 टक्के लोक फक्त स्मार्टफोनमध्येच इंटरनेटचा वापर करतात. अशा देशात, स्मार्टफोन हा भारतातील इंटरनेटचा मुख्य स्त्रोत आहे.

संशोधनात दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही वर्षांत इंटरनेट रहदारीत मोठी वाढ दिसून येईल आणि 2025 पर्यंत इंटरनेट रहदारी दरमहा 3 पट वाढून 21 इबीपर्यंत वाढेल. यावेळी स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ होणार आहे. भारताच्या ग्रामीण भागात येत्या काही वर्षांत स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढेल. संशोधनात दिसून आले की, 2025 पर्यंत, भारतात 41 कोटी नवीन स्मार्टफोन वापरणारे असतील. 2019 मध्ये भारतीयांचा दरमहा डेटा खर्च 12GB होता, जो जागतिक स्तरावर सर्वाधिक आहे. सध्या भारतीय लोक जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये आहेत.