स्मार्टफोन कंपन्यांची नवीन ‘पॉलिसी’, किंमती कमी झाल्यानंतरही फोन खरेदी करणे होणार ‘महाग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्मार्टफोन उत्पादक कंपन्या ग्राहकांना मोबाइल फोन स्वस्त दरात विकण्यासाठी नवीन धोरण स्वीकारत आहेत, त्याअंतर्गत स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या स्तरावर ग्राहकांना स्वस्तात स्मार्टफोन विकतील. पण जेव्हा फोन संपूर्ण ऍक्सेसरीजसह ग्राहकांपर्यंत पोहोचेल, तेव्हा फोन पूर्वीपेक्षा अधिक महाग होईल. खरंतर फोन उत्पादक कंपन्यांनी फोनसह चार्जर आणि हेडफोन न देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे ग्राहकांना फोनच्या चार्जर आणि हेडफोन्ससाठी वेगळी किंमत मोजावी लागेल.

एका वृत्तसंस्थेनुसार, दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग पुढील वर्षापासून फोनसह चार्जर देणार नाही. सॅमसंगने म्हटले की, बर्‍याच लोकांकडे आधीपासूनच चार्जर आहेत. अशात फोन चार्जरविना स्वस्तात विकले जाऊ शकतात. तसेच चार्जर नसल्यामुळे फोन बॉक्स छोटा होईल. यामुळे मोबाईल फोनची शिपमेंट सुलभ होईल, तसेच शिपमेंटची किंमतही कमी होईल. Apple स्मार्टफोनबद्दलही अशीच काही बातमी होती. त्यात दावा केला गेला होता की, Apple कंपनी पुढील वर्षापासून फोन बॉक्ससह EarPods आणि अ‍ॅडॉप्टर्सची विक्री करणार नाही.

म्हणजे Apple iPhone 12 च्या बॉक्समध्ये मोबाइलसह केवळ चार्जिंग केबल येईल. जाणकारांच्या मते, यामुळे iPhone ची किंमत ५० डॉलरने (सुमारे ३,५०० रुपये) कमी होईल. खरं तर, केंद्र सरकारने मोबाइल फोनवरील जीएसटी दरात वाढ केल्याने इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे मोबाइल फोन कंपन्यांना फोनची किंमत वाढवणे हे एक आव्हान आहे. पण कोविड-१९ च्या काळात फोनची मागणी कमी होत आहे. अशा परिस्थितीत स्मार्टफोन उत्पादक कंपन्या चार्जर आणि हेडफोन्स स्वतंत्रपणे विकून फोनची किंमत परवडणार्‍या किंमतीला ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.