‘या’ राज्यातील सरकारनं सट्टेबाजीशी संबंधित ऑनलाइन गेमिंगवर घातली बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  तामिळनाडू सरकारने सट्टेबाजीशी संबंधित ऑनलाइन गेमिंगवर बंदी घातली आहे. सट्टेबाजीच्या खेळात लोकांनी पैसे गमावले आणि आत्महत्या केल्यावर सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर अशा खेळावर बंदी घालण्याचा समाजावर चांगला परिणाम होईल, असा सरकारचा विश्वास आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी नुकतेच सांगितले की, राज्यात एका सट्टेबाजीच्या खेळात पैसे गमावलेल्या लोकांची आत्महत्या आणि असंख्य तक्रारींनंतर सरकार यावर बंदी घालण्यासाठी पावले उचलत आहे. यानंतरच राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शुक्रवारी अध्यादेश काढला होता.

तामिळनाडू सरकारच्या म्हणण्यानुसार, जर एखादी व्यक्ती ऑनलाइन गेमिंगशी संबंधित सट्टेबाजी केल्याबद्दल दोषी आढळल्यास त्याच्याकडून 5,000 रुपये दंड आकारला जाईल आणि सहा महिने तुरुंगातही जावे लागू शकते. याशिवाय सट्टेबाजी खेळ करणाऱ्यास 10,000 रुपये दंडही आकारला जाईल.

आंध्र प्रदेश सरकारने गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये ऑनलाइन गेमिंग, सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यावर बंदी घातली होती. तसेच केंद्राला पत्र लिहून राज्यातील 132 वेबसाइट ब्लॉक करण्याची मागणी केली होती. यामध्ये (Paytm First, Rummy) आणि (EA.com) सारख्या वेबसाइट्सचा समावेश आहे. त्याचबरोबर या ऑनलाइन वेबसाइट्स आणि गेमिंग अ‍ॅप्सचा समाजावर परिणाम होत असल्याचेही सरकारचे मत आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी संप्रेषण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कायदा व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहून 132 ऑनलाइन गेमिंग वेबसाइटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या पत्राद्वारे ऑनलाइन सट्टेबाजीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

बॅनच्या यादीमध्ये या वेबसाइटची नावे समाविष्ट आहेत

ज्या वेबसाइट्सना ब्लॉक करण्याची मागणी केली गेली होती. त्यांच्यामध्ये (Mobile Premier League, Adda52, Rummy, Paytm First), (FIFA) आणि (NHL) अशी नावे आहेत. याशिवाय बॅनच्या यादीमध्ये जगातील दिग्गज गेमिंग कंपनी (EA.com) चे नावही समाविष्ट आहे. तथापि, या यादीमध्ये (Dream11) चे नाव जोडले गेले नाही.