10000 हजाराची लाच घेताना तहसीलदार ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

लाखांदूर/भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई टाळण्यासाठी मासिक हप्ता म्हणून 10 हजार रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्विकारताना लाखांदूर तहसीलदार निवृत्ती जगन उईके यांना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई तहसीलदार यांच्या कक्षात आज (बुधवार) दुपारी करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात लाखांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाखांदूर तालुक्यातील बोथली येथील एका व्यक्तीचा रेती वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे. अवैध रेती वाहतूक प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी मासिक हप्ता दहा हजार रुपयांची मागणी तहसीलदार निवृत्ती उईके यांनी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावरून आज (बुधवार) सापळा रचण्यात आला. तहसीलदाराच्या कक्षातच 10 हजार रुपयाची लाच घेताना उईके यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.