मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत शोधला ‘हिरण्यकेशी’ मासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हे नेहमी दुर्मीळ वन्यजीवांवर संशोधन करत असतात. आता तेजस यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात चौथी नवीन प्रजाती शोधून काढली आहे. आंबोली घाटातील हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणारी माशाची नवी प्रजाती तेजस ठाकरे यांनी शोधली आहे. या माशाची ही 20 वी प्रजाती आहे. तर तेजस यांनी शोधलेली चौथी प्रजाती आहे.

यापूर्वी त्यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पालींच्या दुर्मीळ प्रजाती शोधून काढल्या होत्या. तेजस ठाकरे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्र मासिकांनीही प्रसिद्धी देऊन मान्यता दिली होती. आता हिरण्यकश नदीत शोधलेल्या या नव्या प्रजातीच्या माशाचं नाव ‘हिरण्यकेशी’ असं ठेवण्यात आलं आहे. याचा संस्कृत अर्थ सोनेरी रांगाचे केस असणारा असा आहे. माशाच्या या नवीन प्रजातींना शोधण्यासाठी तेजस यांना अंडर वॉटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर प्रविणराज जयसिन्हा यांचे सहकार्य मिळालं.

https://www.instagram.com/p/CGXnRSRglJl/?utm_source=ig_web_copy_link

यापूर्वी तेजस ठाकरे यांनी काही खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडून तेजस यांनी तब्बल 11 दुर्मीळ प्रजातींचा शोध लावला आहे. त्याआधी कला शाखेत दुसऱ्या वर्षाला असताना त्यांनी खेकड्याच्या पाच प्रजाती शोधल्या. खेकड्यांच्या प्रजातीबद्दलचा त्यांचा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध झाला. या नियतकालिकात आणि वेबसाईटवर तेजस ठाकरे यांचं दुर्मिळ खेकड्यांबद्दलचं दुसरं संशोधन प्रसिद्ध झालं होतं. विशेष म्हणजे पश्चिम घाटातील सह्याद्री या रांगड्या मराठी नावावरून एका खेकड्याचं ‘सह्याद्रियाना’ असं नाव ठेवण्यात आलं होतं.