RJD नेते तेजस्वी यादव यांचा BJP वर निशाणा, म्हणाले – ‘सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन बंगालमध्ये आलात खरे, पण नवरा कोण आहे ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपा इतका मोठा पक्ष आहे. सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन भाजपा पश्चिम बंगालमध्ये आली आहे. मात्र बोहल्यावर बसणारा नवरा कोण आहे? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या एकातरी नेत्याचे नाव सांगा. ज्यांना विधानसभेचा अनुभवच नाही. तुम्ही त्यांच्याकडे सत्ता सोपवणार का? असा खडा सवाल राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी विचारला आहे. बंगालमध्ये भाजपाकडे मुख्यमंत्रीपदाचा एकही उमेदवार नसल्याचे म्हणत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव सध्या पश्चिम बंगाल दौ-यावर आहेत. बिहार निवडणुकांबाबत ते म्हणाले की, आम्ही हरलो नाही तर आम्हाला हरवण्यात आले. बिहारचे सध्याचे सरकार चोर दरवाज्यातून आले आहे. बिहारी जनता ही बाब खूप चांगली समजते, असेही ते म्हणाले. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी तृणमूल काँग्रेससोबत गठबंधन करणार असल्याची चर्चा असतानाच तेजस्वी यादव यांनी सोमवारी तृणमूलच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा काय झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही, पण निवडणुकीत गठबंधनाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.