‘ओवेसींना मिळणार प्रत्येक मत भारतविरोधी’; भाजपकडून टीका

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत भाजप आणि एआयएमआयएम या दोन पक्षात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. निवडणुकीत भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. सोमवारी भाजप नेते खासदार तेजस्वी सूर्या यांनी ओवेसी बंधूंवर निशाणा साधला. त्यांनी ओवेसी हे रोहिंग्या मुस्लिमांना भारतात प्रवेश देतील. पण विकास करणार नाही. त्यामुळे त्यांना मिळणारं प्रत्येक मत हे भारताच्या विरोधात पडणारं मत असेल, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर ४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दोन पक्षांमधील लढाई दिसत असली तरी एआयएमआयएम, भाजपबरोबरच टीएमसीही या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.

सूर्या यांनी असदुद्दीन आणि अकबरुद्दीन हे विकासाबद्दल बोलत आहेत हे खूपच हास्यास्पद आहे, असं म्हटलं आहे. ओवेसी बंधू कधीच जुन्या हैदराबादचा विकास करणार नाहीत. ते केवळ रोहिंग्या मुस्लिमांना भारतात प्रवेश देतील. ओवेसींना मिळणारं प्रत्येक मत हे भारताच्या विरोधात पडणारं मत असेल. असदुद्दीन ओवेसी हे विक्षिप्त इस्लाम, विभाजनवाद आणि टोकाच्या विचारसरणीच्या गोष्टी करतात, याच गोष्टी मोहम्मद अली जिनाही करायचे, असेही ते म्हणाले.

भाजपकडून निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बिहार निवडणुकीत एआयएमआयएमला ५ जागांवर विजय मिळाला होता. त्यावेळी असदुद्दीन ओवेसींनी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकाबाबत बोलताना त्यांनी भाजप या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. तुम्ही भाजप नेत्यांना रात्री झोपेतून उठवलं आणि काही विचारलं तर ते लोकं ओवेसी गद्दार, दहशतवादी आणि पाकिस्तानी आहे, असंच सांगतील. मात्र, भाजपने हे सांगितलं पाहिजे की, मागील वर्षी तेलंगण खास करून हैदराबादला त्यांनी कोणती आर्थिक मदत केली? हैदराबादमध्ये पूर आला तेव्हा मोदी सरकारने काय मदत केली? त्यावेळी त्यांनी काहीच मदत केली नव्हती, आता त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच उरले नाही. त्यामुळे ते धार्मिक मुद्दा निर्माण करत असल्याचा टोलाही ओवेसींनी लगावला होता.

You might also like